केंद्राने केली ईपीएफच्या व्याज दरात घट

 

नवी दिल्ली, वृत्तसेवा । सन २०१९-२० च्या आर्थिक वर्षासाठी भविष्य निर्वाह निधी संघटनेने ८.५०% व्याजदराची शिफारस केली आहे. संघटनेने केलेल्या गुंतवणुकीवर अपेक्षित परतावा न मिळाल्याने संघटनेने यंदा व्याजदर ०.१५ टक्क्याने कमी केला आहे. यामुळे केंद्र सरकारने जवळपास ६ कोटी कर्मचाऱ्यांना जोरदार झटका दिला आहे.

२०१८-१९ मध्ये कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवर ८.६५% व्याज दिले होते. मात्र यंदा नोकरदार मंडळींच्या प्रॉव्हिडंट फंडांतील (पीएफ) ठेवीवर कमी व्याजदर मिळणार आहे. ‘एम्प्लॉइज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन’च्या (ईपीएफओ) गुंतवणुकीवर मिळणारा परतावा कमी होणार असल्याने ही व्याज कमी करण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे. ‘ईपीएफओ’ आर्थिक वर्ष २०२० साठी पीएफमधील ठेवींवरील व्याजदर १५ बेसिस पॉइंटनी घटवून ८.५ टक्के करण्याची शिफारस केली आहे. या मुद्द्यावर ‘ईपीएफओ’च्या केंद्रीय विश्वस्त समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. ‘ईपीएफओ’ला चालू वर्षी व्याजदर गेल्या वर्षीप्रमाणे देण्यात अनेक अडचणी आहेत. गेल्या वर्षभरात दीर्घ मुदतीच्या ठेवी, रोखे आणि गव्हर्न्मेंट सिक्युरिटीमधून ‘ईपीएफओ’ला मिळणाऱ्या उत्पन्नात ५० ते ८० बेसिस पॉइंटची घट झाली आहे.

Protected Content