देशव्यापी ‘भारत बंद’ला प्रारंभ

नवी दिल्ली । कृषी कायदे रद्द करावे या मागणीसाठी दिल्लीत आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांना पाठींबा दर्शविण्यासाठी आज देशव्यापी बंद पुकारण्यात आला असून याचा आज सकाळपासून परिणाम दिसून आला आहे.

नवे तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी देशाच्या राजधानीत शेतकर्‍यांनी गेल्या १३ दिवसांपासून एल्गार पुकारला आहे. या आंदोलनास पाठींबा मिळावा म्हणून आज देशव्यापी बंदची हाक देण्यात आली असून संपूर्ण देशभर दिवसभर बंद पाळला जाईल. या बंदला काँग्रेससह २० राजकीय पक्ष आणि १० ट्रेड युनियन्सनी पाठिंबा दिला आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी ९ डिसेंबर रोजी या विषयावर राष्ट्रपतींची भेटही मागितली आहे.

देशव्यापी बंदच्या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारकडून राज्य व केंद्रशासित प्रदेशांना नियमावली पाठवण्यात आली आहे. नियमावली पाठवताना केंद्रीय गृह मंत्रालयाने राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना भारत बंद दरम्यान कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये आणि कायदा आणि शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी सांगितले आहे. याव्यतिरिक्त, राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेश प्रशासकांनी कोविड -१९ च्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले पाहिजे. सोशल डिस्टन्स राहिल याची काळजी घेतली पाहिजे असे सुचविण्यात आले आहे.

दरम्यान, आज सकाळपासून बंदचा दिल्लीसह अनेक ठिकाणी परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्राचा विचार केला असता बहुतांश कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये लिलाव बंद असल्याने याचा विक्रेत्यांसह ग्राहकांवर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.

Protected Content