भजनलाल शर्मा राजस्थानचे नवे मुख्यमंत्री

जयपुर-वृत्तसेवा | मध्य प्रदेशाच्या मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर केल्यानंतर आता राजस्थानच्या मुख्यमंत्र्याचं नावही भाजपकडून मंगळवारी जाहीर करण्यात आलं. त्यानुसार, भजनलाल शर्मा हे आता राजस्थानचे नवे मुख्यमंत्री असणार आहेत. मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आघाडीवर असलेल्या वसुंधराराजे याचं नाव मागे पडलं त्यानंतर भाजपनं शर्मा यांच्या नावाची घोषणा केली.

राजधानी जयपूर इथं राजस्थान भाजपच्या विधिमंडळ पक्षाची बैठक मंगळवारी पार पडली. या बैठकीत सुरुवातीला माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे यांच्याच नावाची मुख्यमंत्रीपदासाठी चर्चा सुरु होती.

पण अचानक त्यांचं नाव या शर्यतीतून मागे पडलं आणि भाजप आमदार भजनलाल शर्मा यांचं नाव पुढे आलं. त्यानंतर स्वतः वसुंधराराजे यांनीच राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदी भजनलाल शर्मा यांच्या नावाची घोषणा केली. या बैठकीला केंद्रीय संरक्षण मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते राजनाथ सिंह हे देखील उपस्थित होते.

दरम्यान, मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असलेल्या आमदार दिया कुमारी आणि प्रेमचंद बैरवा या दोघांची उपमुख्यमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Protected Content