अपहरण केलेल्या महिलेससह मुलींना सोडून अपहरणकर्ते पसार !

भडगाव संजय पवार । ऊसतोड कामगार पुरवण्याच्या वादात मध्यस्थीच्या पत्नीसह मुलींचे अपहरण करून त्यांना भडगाव येथे सोडल्यानंतर अपहरणकर्ते फरार झाल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील वडगाव नालबंदी येथे घडली आहे.

भडगावः- तालुक्यातील वडगाव- नालबंदी येथे मोठी रक्कम घेऊन ऊसतोड कामगार पुरविले नाही. या पैश्याच्या वादात मध्यस्थीच्या पत्नीचे अपहरण करण्यात आले होते. अपहरण केलेल्या महिलेला भडगाव येथे पोहच करत अपहरण करणारे पसार झाले आहेत. याबाबत पोस्टेला महिला अपहरण करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेचे अपहरण करणारे हे वडगाव- नालबंदी येथिलच असल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.
वडगाव-नालबंदी येथिल मानसिग पोपट चव्हाण हे आपल्या पत्नी आणि मुलींसह राहतात. ते ऊसतोड मजुरी करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितात.

सुमारे तीन वर्षापुर्वी मानसिंग चव्हाण यांच्या मध्यस्थीने जेवळी (ता. तुळजापुर) येथील लेबर ठेकेदार बाळु राठोड व रमेश राठोड यांनी वडगाव नालबंदी येथिलच विठ्ठल हरी राठोड यांच्याशी ऊसतोड मजुर पुरविणे करीता व्यवहार केला होता. या व्यवहारात बाळु राठोड यांनी १ लाख १० हजार व रमेश राठोड यांनी ८० हजार रुपये विठ्ठल हरी राठोड यांस दिले होते. १ लाख ९० हजार रुपये घेऊन देखील विठ्ठल राठोड यांनी ऊसतोड कामगार पुरविले नाही. तसेच ते ऊसतोड कामगार पुरविणे सतत टाळाटाळ करत होते. यामुळे विठ्ठल हरी राठोड यांस बाळु राठोड व रमेश राठोड हे जेवळी येथे घेऊन गेले. त्याला सोडविण्यासाठी मानसिंग चव्हाण गेला नाही म्हणुन दिनांक १३ ऑक्टोबर रोजी ११ वाजेच्या सुमारास मानसिंगची पत्नी हिला तीन मुलींसह अर्जुन हरी राठोड, विजय राठोड, कौश्यल्याबाई राठोड, शांतीलाल राठोड यांनी क्रुझर गाडीत बसवुन घेवुन गेले. त्यांना भांबरवाडी ता. कन्नड येथे क्रुझर गाडी डांबुन ठेवले.

दरम्यान, बुधवारी सकाळी ९ वाजता भडगाव येथे या सर्वांना सोडुन त्यांनी पलायन केले.
याबाबत मानसिंग पोपट चव्हाण यांनी भडगाव पोलीस स्थानकाला दिलेल्या फिर्यादीवरुन अर्जुन हरी राठोड, विजय हरी राठोड, कौश्यल्याबाई राठोड, शांतीलाल मकाराम राठोड सर्व (रा. वडगाव- नालबंदी, ता. भडगाव) यांच्या विरुध्द अपहरण करणे, डांबुन ठेवणे बाबतचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास प्रभारी पोलीस निरीक्षक कीरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शन खाली पोलीस हे. का. कैलास गिते, पोहेका सचिन बावळे हे करीत आहेत.

Protected Content