भडगाव प्रतिनिधी । तालुक्यातील गुढे आणि नावरे गावांना जोडणार्या गिरणा नदीवरील पुलासाठी १८ कोटी २८ लाख रूपयांचा निधी मंजूर झाला असून यासाठी आमदार किशोर पाटील यांचा पाठपुरावा निर्णायक ठरला आहे.
गुढे ते नावरे दरम्यान गिरणा नदीवर पुल नसल्यामुळे परिसरातील नागरिकांना फेर्याने जावे लागत होते. आता केंद्रीय रस्ते विकास निधीतून या पुलाच्या कामासाठी १८ कोटी २८ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या पुलाची लांबी ३५० मीटर असून त्या मुळे परिसरातील नागरिकांचा सुमारे वीस किलोमीटरचा फेरा वाचणार आहे.
आमदार किशोर पाटील यांच्या पाठपुराव्यांमुळे हा प्रश्न मार्गी लागला आहे. तालुक्यातील खेडगाव, जुवार्डी, आडळसे, नावरे, वाडे, गुढे, गोंडगाव, कजगाव, पथराड, पेंडगाव, मळगाव, बांबरूड पाट स्थळ या भडगाव तालुक्यातील गावांना या पुलाचा मोठा फायदा होणार आहे.
या पुलाच्या बांधकामास निधी मंजूर केल्याने केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, एकनाथ शिंदे, पालकमंत्री गुलाबराव पाटील, मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांचे सहकार्य लाभल्याचे आमदार पाटील यांनी निवेदनाच्या माध्यमातून जाहीर केले आहे.