गोळीबार प्रकरणात परस्पर विरोधी गुन्हे दाखल

भडगाव प्रतिनिधी | तालुक्यातील पळासखेडा येथे झालेल्या गोळीबार प्रकरणात जखमी अशोक पाटील यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित विजय पाटील यांनी देखील अशोक पाटील यांच्यासह तिघांवर जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

तालुक्यातील पळासखेडा येथे शेतातील जुन्या वादातून व पूर्व वैमनस्यातून झालेल्या गोळीबारात एक जण पाठीत गोळी लागून जखमी झाल्याची घटना घडली आहे. याबाबत भडगाव पोलिसात रात्री उशिरापर्यंत परस्पर विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जखमी अशोक शिवाजी पाटील वर जळगाव येथे जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून एकास अटक करण्यात आली आहे.
भडगाव तालुक्यातील पळासखेडा येथे शेतात चुलत भाऊंचा वाद झाला.यातशेतकरी किशोर शिवाजी पाटील ( वय ३७ ) यांनी फिर्यादीत म्हटले आहे की किशोर शिवाजी पाटील व भाऊ अशोक शिवाजी पाटील, आई सुशीलाबाई पाटील यांना विजय पाटील यांच्या शेतातील विहिरीजवळ रस्त्यावरून येण्या जाण्याच्या कारणावरूनविजय दोधा पाटील यांनी शिवीगाळ व धक्काबुक्की करून तुम्हाला जिवंत सोडणार नाही व त्यांच्या कडील रिव्हॉल्व्हर काढून त्यांनी ३-४ वेळा फायर केला. यात अशोक शिवाजी पाटील याचे केस पकडून त्यास खाली वाकून त्याचे पाठीवर रिव्हॉल्व्हरने फायर करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. म्हणून किशोर शिवाजी पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भडगाव पोलिसात गु.र.न १७१ /२०२१ भादंवि कलम ३०७, ३२३, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा तपास पोलीस उप निरीक्षक आनंद पठारे करीत आहेत .

दरम्यान, यानंतर विजय दोधा पाटील यांनी देखील अशोक पाटील यांच्यासह तिघांविरूध्द गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्यांनी पोलीस स्थानकात दिलेल्या फिर्यादितम्हटले आहे की, सकाळी ९ वाजता माझ्या पळासखेडा शिवारातील गट नंबर २२/२ शेतात स्वतःच्या विहिरीजवळ मी तणनाशक फवारत असताना अशोक शिवाजी पाटील, किशोर शिवाजी पाटील सुशिलाबाई शिवाजी पाटील (सर्व राहणार पळासखेडा) या तिघांनी माझ्या शेतात येऊन मला म्हणाले की तु मोटार चोरीची केस केली आहे. व दोन तीन वेळा आमच्यावर केस केल्या आहेत. तु गावातील इतर भ्रष्टाचाराच्या केस करतो, या कारणावरून अशोक पाटील यांनी विळ्याने हल्ला करण्यासाठी अंगावर धावून आला. किशोर पाटील याने काठीने मारहाण करुन सुशिलाबाई पाटील हिने शर्ट पकडून चापटाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली व तुला आज जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. म्हणुन विजय दोधा पाटील यांच्या फिर्यादीवरून तिघांविरुध्द कलम ४४७, ३२३, ३५२, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेचा तपास पोलीस नाईक पांडुरंग गोरबंजारा करीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
घटनास्थळी दुपारी उपविभागीय पोलीस अधिकारी कैलास गावडे, फॉरेन्सिक लॅब जळगाव चे पथक, प्रभारी पोलीस निरीक्षक रवींद्र जाधव, पोलीस उपनिरीक्षक आनंद पठारे व पोलीस कर्मचारी यांनी भेट दिली.

Protected Content