विवाहविषयक फसवणूक टाळण्यासाठी काळजी घ्या – यशोमती ठाकूर

मुंबई – तंत्रज्ञान शिकत असताना, त्याचा वापर करत असताना आपल्या खाजगी व व्यक्तीगत जीवनाविषयी कोणत्या व्यक्तीला किती माहिती द्यावी व सतर्क राहून सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकण्यापासून स्वत:ला कसे वाचवावे याबाबत महिलांनी अधिक जागरुक राहणे आवश्यक आहे, असे यशोमती ठाकूर म्हणाल्या.

पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेमार्फत आयोजित करण्यात आलेल्या मॅट्रिमोनिअल साईटवरून होणाऱ्या सायबर गुन्हेगारीविषयी जनजागृतीपर ऑनलाईन वेबिनारचे उद्घाटन मंत्री ॲड.ठाकूर यांच्या हस्ते झाले. यावेळी पोलीस सहआयुक्त (गुन्हे) मिलिंद भारंबे, सायबर गुन्हे शाखेच्या उपायुक्त डॉ. रश्मी करंदीकर आदी उपस्थित होते.

उद्घाटनानंतर वेबिनारमध्ये मार्गदर्शन करताना मंत्री ॲड. ठाकूर म्हणाल्या की, सध्याचे युग हे डिजिटल युग आहे. दिवसेंदिवस सगळ्याच क्षेत्रातील तंत्रज्ञानामध्ये प्रगती होत आहे. परंतु, तंत्रज्ञानाच्या योग्य वापराचे जसे फायदे आहेत त्याचप्रमाणे गैरवापर केल्यामुळे तोटेही आहेत, आणि याच गोष्टीचा फायदा गुन्हेगार घेत आहेत. इंटरनेटचा वापर वेगाने वाढत असतानाच सायबर गुन्हे करण्याच्या प्रमाणातही दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे.

ॲड. ठाकूर म्हणाल्या, फेसबुक, इन्स्टाग्राम आदी सोशल मीडिया अकाऊंटच्या माध्यमातून आपण मित्र- मैत्रिणी, नातेवाईक तसेच विविध माध्यमातून ओळखी झालेल्या लोकांच्या संपर्कात राहत असतो.  काही वेळेस फक्त एखादी व्यक्ती आपल्या सोशल मीडियावरील फ्रेंडलिस्टमध्ये आहे किंवा चांगल्या स्वभावाची वाटत आहे म्हणून कोणतीही सावधगिरी न बाळगता त्या व्यक्तीच्याही संपर्कात येतो. बहुदा अशा प्रकारे महिलांसंदर्भात घडणाऱ्या सायबर गुन्ह्यांची सुरुवात होत असते. त्यामुळे तंत्रज्ञान शिकत असताना, त्याचा वापर करत असताना आपल्या खाजगी व व्यक्तीगत जीवनाविषयी कोणत्या व्यक्तीला किती माहिती द्यावी व सतर्क राहून सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकण्यापासून स्वत:ला कसे वाचवावे याबाबत महिलांनी अधिक जागरुक राहणे आवश्यक आहे, असेही त्या म्हणाल्या.

 

Protected Content