पंतप्रधान मोदी हे तर निरागस बालकासमान ! : शिवसेनेने उडविली खिल्ली

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | शिवसेनेचे मुखपत्र असणार्‍या दैनिक सामनामधून आज पुन्हा एकदा पंतप्रधान मोदी यांना लक्ष्य करतांना त्यांच्यावर खोचक टीका करण्यात आली आहे.

दैनिक सामनाच्या आजच्या अग्रलेखात पंतप्रधान मोदी यांना टार्गेट करण्यात आले आहे. यात म्हटले आहे की, आपले प्रिय पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांचे मन एखाद्या अजाण बालकाप्रमाणे निरागस आणि निष्पाप आहे. बालकाच्या हाती एखादे खेळणे वगैरे दिल्यावर ते आपल्याच धुंदीत, मजेत खेळत बसते. आजूबाजूला काय चालले आहे याच्याशी त्या बालकास घेणेदेणे नसते. आपले पंतप्रधान हे तसेच आहेत. नरेंद्र भाईंनी दोन दिवसांपूर्वी एक निरागस व निष्कपट विधान केले. ते म्हणाले, ‘‘देशात भ्रष्टाचाऱयांविरोधातील कारवायांमुळे राजकारणात नवे ध्रुवीकरण सुरू झाले आहे. ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत त्यांना वाचविण्यासाठी काही राजकीय गट एकत्र येत आहेत.’’ मोदी यांचे विधान गांभीर्याने घ्यावे की एका निरागस बालकाचे बोल म्हणून सोडून द्यावे हा ज्याचा त्याचा प्रश्न; पण एक मात्र नक्की, बिहारमधून नितीश कुमारांनी बंड करून आव्हान देताच मोदी यांच्या मनात खळबळ माजलेली दिसते.

यात पुढे म्हटले आहे की, महाराष्ट्रात तर भ्रष्ट मंडळींना बाजूला घेऊन त्यांनी एक गट केला. (ज्यास आता शिंदे गट किंवा ओरिजनल शिवसेना वगैरे सांगून ढोल बडवले जात आहेत!) स्वतः शिंदे व त्यांच्या लोकांवर ईडी चौकशीचे जोखड होतेच. त्यांच्या बरोबरच्या किमान दहा आमदारांची ईडी चौकशी सुरू होती. म्हणजे भ्रष्टाचार होताच. काहींनी अटकपूर्व जामीन घेतले. या सगळयांचा एक राजकीय गट करून त्यांच्या बरोबर भाजपने महाराष्ट्रात सरकार स्थापन केले. पुन्हा आश्चर्य असे की, या गटाचे आमदार सांगतात, आम्ही भ्रष्ट असलो तरी न्यायालयाचा निकाल आमच्या बाजूने लागेल! निरागस मोदी यांनी या सर्व प्रकरणाचा नीट अभ्यास केला पाहिजे असा टोला यात मारण्यात आला आहे.

अग्रलेखात पुढे म्हटले आहे की, महाराष्ट्रातील भ्रष्टाचारी गटास ‘शिवसेना’ असे वारंवार संबोधणे हासुद्धा भ्रष्टाचार आहे. खासदार भावना गवळी यांना तुरुंगात टाकण्याची भाषा भाजपचे लोक करीत होते, पण भावनाताईंकडून मोदी यांनी प्रेमाने राखी बांधून घेतल्याने ताईंवरचे सगळे आरोप ‘स्वच्छ’ झाले. संजय राठोड या मंत्र्याची एक ‘क्लिप’ आजही पुण्याच्या पह्रेन्सिक लॅबमध्ये आहे. भाजपच्या रणवाघिणीने ती क्लिप दिल्लीत जाऊन पंतप्रधान मोदी यांना दाखवायला हवी. म्हणजे आपण किती अंधारात आहोत व आजूबाजूचे सत्य आपल्यापर्यंत कसे पोहोचू दिले जात नाही हे त्यांना समजेल. महाराष्ट्रात चंद्रकांत बावनकुळे यांना नेमक्या कोणत्या कारणांमुळे विधानसभेची उमेदवारी नाकारली होती? त्यामागची निरागस भावना लोकांसमोर आली पाहिजे.

यात शेवटी नमूद केलेय की, नितीश कुमारांचे नेतृत्व उत्तरेत वरचढ ठरू शकेल व त्याचा फटका भाजपला बसेल असा लोकांचा अंदाज आहे. मोदी यांनी एक वार केला की नितीश लगेच पलटवार करून उत्तर देतात. त्यावर भक्तांची तोंडे बंद होतात. पंतप्रधान मोदी यांनी आता जे राजकीय गटाचे टुमणे सुरू केले, पण तो वार त्यांच्यावरच उलटला आहे. भ्रष्टाचाऱयांवरील कारवाईतून नवा राजकीय गट उदयास येत आहे, हे त्यांचे म्हणणे जर खरे मानले तर महाराष्ट्रातील भाजपच्या मांडीवर बसलेला ‘शिंदे गट’ हेच त्याचे उत्तर आहे. मोदी भाबडे आहेत. निरागस आहेत. निष्पाप आहेत. त्यांना कोणी तरी सत्य माहिती द्यायला हवी असा खोचक सल्ला येत दिलेला आहे.

Protected Content