सोशल मीडियावरील अफवांपासून सावध रहा !; शांतता कमिटीच्या बैठकीत पोलीसांचे आवाहन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जिल्हा पोलीस दलाच्या वतीने रमजान ईद, श्रीराम नवमी, हनुमान जयंती आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर शांतता कमिटीची बैठक मंगळवारी २५ मार्च रोजी सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात पार पडली. या बैठकीत जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.

या बैठकीला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधिक्षक अशोक नखाते, अपर पोलीस अधिक्षक कविता नेरकर, विभागीय पोलीस अधिकारी कृष्णांत इंगळे यांच्यासह विविध समाजातील प्रतिष्ठित नागरिक आणि संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

शांततेच्या दृष्टीने प्रशासनाचा सजग संदेश
बैठकीत बोलताना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले की, “शांतता कमिटीच्या सदस्यांना आपल्या परिसरातील घडामोडींची माहिती असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जर कोणत्याही अनुचित घटनेची शक्यता दिसत असेल, तर त्वरित स्थानिक पोलीस ठाण्याला माहिती द्यावी. यामुळे संभाव्य अनुचित प्रकार रोखता येतील.” त्यांनी नागरिकांना शांततेत आणि सलोख्यात सण साजरे करण्याचे आवाहन केले.

पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी नागरिकांना सोशल मीडियावरील अफवांना बळी न पडण्याचे आणि कुणी आक्षेपार्ह मजकूर शेअर करत असेल, तर त्याची त्वरित माहिती पोलिसांना द्यावी, असे सांगितले. “अनावश्यक व्हिडिओ किंवा अफवा पसरवणाऱ्या पोस्टकडे दुर्लक्ष करावे, तसेच सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर करावा,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

सर्वधर्मीय समाज बांधवांचा सहभाग
या बैठकीत हिंदू, मुस्लिम, बौद्ध आणि इतर समाज बांधवांसह विविध संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. उपस्थित नागरिकांनी विविध प्रश्न विचारले, त्यावर जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनी समाधानकारक उत्तरे दिली.

शांततेसाठी प्रशासनाची सज्जता
या बैठकीत घेतलेल्या निर्णयांनुसार, आगामी सण आणि उत्सवांच्या काळात पोलीस प्रशासन अधिक सतर्क राहणार असून, कायदा-सुव्यवस्थेचा भंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. समाजातील सर्व घटकांनी परस्पर सामंजस्याने आणि सलोख्यात हे सण साजरे करावेत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Protected Content