नोकर न होता नोकरी देणारे व्हा : ॲड. रोहिणीताई खडसे खेवलकर

WhatsApp Image 2019 07 16 at 1.35.28 PM

मुक्ताईनगर,प्रतिनिधी । आयटीआय झालेल्या तरुणांनी नोकरीच्या मागे न धावता आपल्याकडे जे कौशल्य आहे त्याचा उपयोग समाजासाठी करून स्वतःचे व्यवसाय सुरू केले पाहिजेत असे आवाहन जिल्हा बँकेच्या अध्यक्षा तथा मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटीच्या चेअरमन ॲड. रोहिणीताई खडसे खेवलकर यांनी केले.

 

त्या मुक्ताईनगर येथिल कै. ग. सु. वराडे आयटीआयमध्ये कौशल्य विभागाने आयोजित केलेल्या मुबई येथील सह्याद्री अतिथी गृहामध्ये विडिओ कॉन्फरन्सिंगच्या थेट प्रक्षेपणाद्वारे सुरू असलेल्या ई-पदवीदान समारंभा प्रसंगी केले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे संचालक पुरुषोत्तम महाजन, प्राचार्य सुजित पाटील हे होते. १५ जुलै जागतिक युवा कौशल्य दिन म्हणून संपूर्ण राज्यात साजरा करण्यात आला त्याचे औचित्य साधून येथील कै ग सु वराडे आयटीआय मधील फिटर,मशिनिस्ट, टर्नर या व्यवसायातील जुलै २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत दहा विद्यार्थी महाराष्ट्रातून प्रथम द्वितीय आणि तृतीय या क्रमांकाने उत्तीर्ण झालेत त्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी ऍड. सौ खडसे खेवलकर पुढे म्हणाल्या की, आयटीआय झालेला प्रत्येक विद्यार्थी हा कुशल कारागीर असतो. त्याच्याकडे त्या व्यवसायाचे कौशल्य असते. पण तरीही अनेक विद्यार्थी नोकरीच्या मागे धावत असतात. ग्रामीण भागात कुशल कारागीर मिळेनासा झाला आहे. काही वेळेस तर शहरातून कुशल कारागिरांना बोलवावे लागते. बरेच विद्यार्थी कौशल्य असूनही नोकरीच्या मागे धावतात तर अनेक जण रिकामे असतात. नोकरीच्या मागे न लागता ज्याला जमेल त्याने छोटासा का होईना आपल्याकडे असलेल्या कौशल्याचा वापर करून स्वतःचा उद्योग उभारला पाहिजे. सुरुवातीला अडचणी येतील पण प्रामाणिकपणा जिद्द आणि सचोटीच्या जोरावर सुरूवातीला प्रचंड मेहनत घेत स्किल डेव्हलप करून नाव कमावल्यानंतर ग्राहक आपल्याकडे आपोआप यायला सुरुवात होते. आणि पुढे आपण रोजगार देणारे होतो हे उदाहरणासह स्पष्ट केले. छोट्या उद्योगातून मोठे होऊन त्यांचे नाव जगभरात घेतले जाते. म्हणूनच आपण उद्योगाकडे वळावे असे आवाहन ऍड. रोहिणीताई खडसे खेवलकर यांनी विद्यार्थ्यांना केले. प्रास्ताविक प्राचार्य सुजित पाटील यांनी तर सूत्रसंचालन सतीश चौधरी व आभार एस. पी. बोरोले यांनी मानले. यावेळी वराडे आयटीआय मधील महाराष्ट्रातून प्रथम आलेले फिटर व्यवसायाचे धीरज काटे, चेतन पाटील, अजय मोरखेडे, मशिनिस्ट व्यवसायाचे गणेश पाटील, अनिकेत नेमाडे, पराग वराडे, टर्नर व्यवसायातील गजानन सावळे, हर्षल सुपे, गणेश पाटील, धीरज पाटील या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. यास्वीतेसाठी सर्व निदेशकांनी कामकाज पहिले.

Protected Content