अधिष्ठाता डॉ. रामानंद यांचा नगरसेवक नाईक यांनी केला सत्कार

जळगाव, प्रतिनिधी  । महानगरपालिकेचे स्थायी समिती सदस्य तथा मेहरुण भागातील नगरसेवक प्रशांत नाईक यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या कार्यकाळास एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल तसेच जळगावच्या रुग्णालयाला नावलौकिक प्राप्त करून दिल्याबद्दल पुष्पगुच्छ देऊन अधिष्ठातांचा सन्मान केला आहे.  शासकीय रुग्णालयाला शिवसेनेकडून आवश्यक ती मदत पुरविली जाणार असल्याची माहिती प्रशांत नाईक यांनी यावेळी दिली.

 

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाची वर्षभरापूर्वी ज्या प्रकारे दुर्दशा झाली होती, ती दुर्दशा गेल्या वर्षभरात आपल्या शिस्तप्रिय, कडक प्रशासन आणि पारदर्शी कारभार यामुळे अधिष्ठाता डॉ.जयप्रकाश रामानंद यांनी दूर केली. यामुळे जळगावच्या या ‘सिव्हिल’ हॉस्पिटलचे रूप पालटून गेले आहे. सर्वसामान्य नागरिक जेव्हा उपचार घेण्यासाठी येतो त्या वेळेला रुग्णालयाचा परिसर स्वच्छ आणि चैतन्यमय दिसत असल्यामुळे त्याला रुग्णालयात उपचार घेण्यासाठी मानसिकता तयार होते. रूग्णालयात अत्याधुनिक सेवासुविधा, तज्ज्ञ डॉक्टरांची टीम, तज्ज्ञ परिचारिका, कक्षसेवक देखील आहेत. रुग्णांना मोफत उपचार व्हावे यासाठी महाविकास आघाडीने आणलेल्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा देखील लाभ दिला जातो. वर्षभरामध्ये अधिष्ठाता डॉ. रामानंद यांनी हे सर्व उभारून आपल्या जळगावचे नाव उंचावले आहे. त्यामुळे हे जनतेचे रुग्णालय आहे व या रुग्णालयात आपल्याला आवश्यक ती मदत सांगा शिवसेनेतर्फे ती पुरविली जाईल असे सांगत लवकरच मोठ्या आकाराच्या कचराकुंड्या शिवसेनेतर्फे दिल्या जाणार असल्याची माहिती स्थायी समिती सदस्य तथा नगरसेवक प्रशांत नाईक यांनी दिली. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे कर्मचारी अनिल बागलाणे, जनसंपर्क सहाय्यक विश्वजीत चौधरी उपस्थित होते.

 

Protected Content