बोदवड येथे बीडीओ तर रिक्त ठिकाणी ग्रामसेवकांची नियुक्ती करा : रोहिणी खडसे

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | बोदवड येथे कायमस्वरूपी गटविकास अधिकार्‍याची नियुक्ती करावी तसेच बोदवड व मुक्ताईनगर तालुक्यांमधील ग्रामसेवकांच्या रिक्त जागा भरण्याच्या मागणीचे निवेदन रोहिणीताई खडसे यांनी जि. प. सीईओ यांनादिलेल्या निवेदनाच्या माध्यमातून केले आहे.

या संदर्भातील माहिती अशी की, बोदवड येथे गेले कित्येक महिन्यांनापासून गट विकास अधिकारी पद रिक्त असून शेजारच्या तालुक्यातील गट विकास अधिकारी प्रभारी म्हणून बोदवड पंचायत समितीचा कार्यभार बघत आहेत. त्यामुळे ग्रामिण भागातील विकास कामे खोळंबली आहेत. तसेच बोदवड आणि मुक्ताईनगर तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसेवक पद रिक्त असल्याने, एकाच ग्रामसेवकाकडे अनेक गावांचा प्रभार असल्याने गाव कारभार्‍यांना ग्रामविकासाचा गाडा हाकताना अडचणी येत आहेत.

सामान्य नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यापासून वंचित राहावे लागत आहे म्हणून बोदवड येथे कायम गट विकास अधिकार्‍याची नियुक्ती करावी आणि मुक्ताईनगर आणि बोदवड तालुक्यात रिक्त असलेल्या जागी ग्रामसेवकांची नियुक्ती करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्ष महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित यांची भेट घेऊन केली.

या निवेदनात नमुद करण्यात आले आहे की, पंचायत राज्यव्यवस्थेत ग्रामपंचायतीला महत्वपूर्ण स्थान आहे. ग्रामीण जनतेशी प्रत्यक्ष संपर्क साधणारी ’लोकशाही संस्था’ असे तिचे स्वरुप असल्याने तिला पंचायतराज संस्थेचा पायाभूत घटक मानले जाते. ग्रामपातळीवर विकास कामांचा विचार करता, सरपंचा सोबत ग्रामसेवकाला ग्रामपंचायतीचा सचिव म्हणूनमहत्वाची भूमिका बजवावी लागते. गावाच्या विकासाच्या दृष्टीने, विकासकामांचे नियोजन, ग्रामपंचायत निधी, ग्रामसभा अहवाल, ठरावांची अंमलबजावणी, पत्रव्यवहार, शासकीय योजनेचे व्यवस्थापन,जन्म मृत्य नोंद ठेवणे , कर वसुली करणे, ग्रामपंचायतचा वार्षिक विकास आराखडा तयार करणे,शासनाकडून तसेच जिल्हा परिषदेकडून वेळोवेळी जाहीर होणार्‍या योजनांची माहिती प्राप्त करून ती ग्रामसभा, मासिक सभेमार्फत ग्रामस्थांपर्यंत पोहचवणे व त्याबाबतची माहिती ग्रामस्थांना देणे. व पंचायत समिती पातळीवरील तांत्रिक अधिकार्‍यांचे मार्गदर्शन घेऊन त्या योजना गावात राबविणे, इत्यादी सारख्या अनेक जबाबदार्‍या ग्रामसेवक पार पाडत असतात.

निवेदनात पुढे नमूद करण्यात आले आहे की, एक अर्थाने ग्रामस्थ आणि शासनाला जोडणारा पुल म्हणून ग्रामसेवक कार्य करत असतात परंतु बोदवड तालुक्यात ३९ ग्रामपंचायतीसाठी केवळ ७ आणि मुक्ताईनगर तालुक्यात ६१ ग्रामपंचायतीसाठी ३४ ग्रामसेवकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे .एका ग्रामसेवकाकडे चार ते पाच ग्रामपंचायतींचा कार्यभार आहे. त्यामुळे ते प्रत्येक ग्रामपंचायतीला पुरेसा वेळ देऊ शकत नाही. त्यामुळे तालुक्यातील ग्रामविकासाचा खेळखंडोबा झाला आहे, ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांना, सरपंचांना आठवडा आठवडा ग्रामसेवकांची वाट बघावी लागते. त्यामुळे ग्रामपंचायत पातळीवर राबविण्यात येणार्‍या शासनाच्या योजनांची योग्य प्रकारे अंमलबजावणी होत नाही. परिणामी विकास कामांमध्ये अडचणी येतात तसेच ग्रामस्थांना योजनांसाठी लागणारे कागदपत्रे वेळेवर उपलब्ध होत नाहीत त्यामुळे अनेक शासकीय योजनांच्या लाभापासून ग्रामस्थांना वंचित राहावे लागत आहे.

तालुक्यामधील सर्व विकास कामांची अंमलबजावणी करणे. विकास योजनांवर देखरेख ठेवणे. नियंत्रण करणे पंचायत समितीच्या योजना व निर्णयांबाबत कार्यवाही करण्याचे काम हे पंचायत समितीचे गट विकास अधिकारी करत असतात. पंचायत समिती व जिल्हा परिषद म्हणजेच राज्य शासन यामधील दुवा म्हणून गटविकास अधिकारी काम पाहतात. परंतु बोदवड पंचायत समितीमध्ये कायम स्वरूपी गट विकास अधिकार्‍याची नियुक्ती नसून गेल्या अनेक दिवसा पासून प्रभारी अधिकारी हे बोदवड पंचायत समितीचा कार्यभार बघत आहेत त्यामुळे योजनांची योग्य प्रकारे अंमलबजावणी होत नसून तालुक्यातील ग्रामविकासावर त्याचा परिणाम होत असून शासकीय योजना समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहचण्यास अडचण निर्माण होत आहे.

बोदवड तालुका हा कायम अवर्षणग्रस्त, दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. नेहमी अस्मानी संकटात असणारा हा तालुका आता तालुक्यात रिक्त असलेल्या गट विकास अधिकारी, ग्रामसेवक यांच्या रिक्त जागांमुळे आता सुलतानी संकटातसुद्धा सापडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. तरी ग्रामस्थांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा तालुक्याच्या ग्रामविकासाला गती यावी यासाठी आपण आपल्या स्तरावरून उचित कार्यवाही करून बोदवड पंचायत समितीसाठी कायमस्वरूपी गट विकास अधिकार्‍याची नियुक्ती करावी तसेच तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीला स्वतंत्र ग्रामसेवकाची नियुक्ती करावी अन्यथा राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे ग्रामस्थांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही या निवेदनात देण्यात आला आहे.

निवदेन देतांना राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार युवक कॉंग्रेस प्रदेश चिटणीस विजय चौधरी, एणगाव येथील सरपंच विनोद कोळी, मुक्तळ येथील जितेंद्र पाटील, शाम सोनवणे, अजयसिंह पाटील, अमोल पाटील, विलास चौधरी आदी उपस्थित होते.

Protected Content