जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | मंजूर केलेले विकास कामांचे केलेले बिल अदा करण्यासाठी आणि दुसऱ्या गावात घेतलेल्या कामांची वर्क ऑर्डर काढून देण्यासाठी २ लाख रुपयांची लाच मागितली म्हणून पारोळा येथील बिडीओ आणि विस्तार अधिकाऱ्यांवर पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही कारवाई जळगाव एसीबी ने केली आहे.
अधिक माहिती अशी की, तक्रारदार हे पारोळा तालुक्यातील आहे, त्यांनी दलीत वस्ती सुधार योजनेअंतर्गत पारोळा तालुक्यातील सावखेडा होळ गावी पेव्हर ब्लॉक बसविणे व काँक्रिट रस्ता बनवण्याचे ७ लाखांचे व सावखेडा तुर्क गावातील रस्त्यांचे खडीकरण करण्याचे ६० लाखांचे ३ कामे तसेच शासनाच्या ९०-१० हेडखाली ३० लाखांचे ३ अशी एकूण ९० लाखाचे ६ कामे घेतली होती. त्यापैकी सावखेडा होळ गावात केलेल्या कामांचे उर्वरित पैशाचे बिल व सावखेडा तुर्क गावात घेतलेल्या कामांची वर्क ऑर्डर काढून देण्याचे मोबदल्यात गटविकास अधिकारी किशोर दत्ताजीराव शिंदे (वय ५६, रा.जळगाव) यांनी तक्रारदाराकडे २ लाख रुपये लाच रकमेची मागणी केली होती.
त्यावेळी विस्तार अधिकारी सुनील अमृत पाटील (वय ५८, रा. मुक्ताईनगर, जळगाव) यांनी तक्रारदाराला २ लाख रुपये लाच रकमेपैकी ५० टक्के प्रमाणे १ लाख रुपये लाच रक्कम ऍडजस्ट करून सदर लाच रक्कम गटविकास अधिकारी किशोर शिंदे यांना देण्यास समर्थन दिले. तसेच विस्तार अधिकारी गणेश प्रभाकर पाटील (वय ५०, रा.मानसिंगका नगर, पाचोरा), वरिष्ठ लिपिक अतुल पंढरीनाथ पाटील (वय ३७, रा. मोंढाळे प्र. अ.ता.पारोळा) , सहाय्यक कार्यक्रम अधिकारी योगेश साहेबराव पाटील (वय ३७, रा.गुलमोहर बाग,पारोळा) यांनीसुद्धा तक्रारदाराकडे स्वतः साठी व गटविकास अधिकारी शिंदे यांचे लाच मागणी प्रमाणे त्यांचे करिता २ टक्के प्रमाने रक्कम देण्यास प्रोत्साहन दिले म्हणून त्यांच्या विरुद्ध पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे पारोळा तालुक्यात खळबळ उडाली आहे.