जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । वाळू चोरी करण्यासाठी जात असल्याच्या संशयावरून बापलेकाला चार जणांनी बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना शुक्रवारी १७ मे रोजी रात्री १२ वाजता जळगाव तालुक्यातील नंदगाव फुपनी गावात घडली. याप्रकरणी शनिवारी १८ मे रोजी सायंकाळी ५.३० वाजता मारहाण करणाऱ्या चौघांवर जळगाव तालुका पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक असे की, जळगाव तालुक्यातील किनोद गावात राहणारा किरण प्रभाकर सपकाळे वय ३२ हा तरूण आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. शुक्रवारी १७ मे रोजी रात्री १२ वाजता किरण सपकाळे हा त्याचे वडील प्रभाकर सपकाळे यांच्यासोबत चारचाकी वाहन क्रमांक (एमएच १९ सीवाय १७६२) ने जळगाव तालुक्यातील नंदगाव फुपनी गावाजवळून जात होते. त्यावेळी वाळू चोरी करण्यासाठी नदीपात्रात वाहन जात असल्याचा संशय नंदगाव फुपनी गावात राहणारे कुलदिप श्रीराम पाटील, रामलाल बापू पाटील, प्रशांत संभाजी पाटील, आणि बंडू सुनील पवार यांना आला. त्यांनी गावाजवळ किरण सपकाळे याचे वाहन आडविले. काहीही विचारणा न करता किरण सपकाळे व त्याचे वडील प्रभाकर सपकाळे यांना चौघांकडून मारहाण करण्यात आली. तसेच वाहनाच्या काचा फोडून नुकसान केले. हा प्रकार घडल्यानंतर किरण सपकाळे याने शनिवारी १८ मे रोजी सायंकाळी साडेपाच वाजता जळगाव तालुका पोलीसात धाव घेवून चौघांविरोधात तक्रार दिली. त्यानुसार कुलदिप श्रीराम पाटील, रामलाल बापू पाटील, प्रशांत संभाजी पाटील, आणि बंडू सुनील पवार सर्व राहणार नंदगाव फूपनी ता. जळगाव यांच्या विरोधात जळगाव तालुका पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ हरीलाल पाटील हे करीत आहे.