नवी दिल्ली, वृत्तसंस्था | देशभरातील बँक कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप अखेर मागे घेण्यात आला आहे. राष्ट्रीयीकृत बँकांचे विलिनीकरण आणि आपल्या अन्य मागण्यांसाठी बँक कर्मचाऱ्यांच्या चार संघटनांनी २६ आणि २७ सप्टेंबर रोजी संपावर जाण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान, सोमवारी या संघटनांची अर्थ विभागाचे सचिव राजीव कुमार यांच्यासोबत बैठक पार पडली. या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा झाली असल्याचे सांगत संप मागे घेण्यात आल्याची माहिती संघटनांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
बँक कर्मचाऱ्यांच्या चार संघटनांनी २६ आणि २७ सप्टेंबर रोजी संपाचा इशारा दिला होता. चौथा शनिवार आणि रविवार या सुट्टीच्या दिवसांना जोडून हा संप पुकारण्यात आल्याने बँकेचे कामकाज चार दिवस ठप्प राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. केंद्र सरकारने १० बँकांचे विलिनिकरण करून चार मोठ्या बँका करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या विरोधात तसेच आपल्या अन्य मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला होता. ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कॉनफेडरेशन (AIBOC), ऑल इंडिया बँक आफिसर्स असोसिएशन (AIBOA), इंडियन नॅशनल बँक ऑफिसर्स काँग्रेस (INBOC)आणि नॅशनल ऑर्गेनायझेशन ऑफ बँक ऑफिसर्स (NOBO) या संघटनांनी संपाची घोषणा केली होती. परंतु आता संप मागे घेण्यात आल्यामुळे ग्राहकांची गैरसोय टळणार आहे.
बँकांचे विलिनिकरण करण्यात येऊ नये, तसेच पाच दिवसांचा आठवडा करण्यात यावा, रोख व्यवहारांची वेळ कमी करावी, अशा विविध मागण्या कर्मचाऱ्यांकडून करण्यात आल्या होत्या. सरकारने १० बँकांचे विलिनिकरण करून चार बँका करण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत युनायटेड बँक ऑफ इंडिया आणि ओरिएंटल बँकेचे पीएनबी बँकेत विलिनीकरण होणार आहे. तर सिडिकेट बँकचे कॅनरा बँकेत, अलाहाबाद बँकेचे इंडियन बँकेत आणि आंध्रा बँक आणि कॉर्पोरेशन बँकचे युनियन बँकेत विलिनिकरण करण्यात येणार आहे.