मुंबई प्रतिनिधी | आगामी नवरात्रीसाठी राज्य सरकारने नियमावली जाहीर केली असून गेल्या वर्षाप्रमाणेच यंदा देखील गरबा आणि दांडियावर बंदी कायम ठेवण्यात आली आहे. तसेच अन्य नियम देखील आखून दिले आहेत. जाणून घ्या नवरात्रीची पूर्ण नियमावली.
येत्या ७ ऑक्टोबरपासून सुरू होत असलेल्या नवरात्रोत्सवासाठी राज्य सरकारने नियमावली जाहीर केली आहे. कोरोनाचे सावट कायम असल्यामुळे नागरिकांनी मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन गदी करुन उत्सव साजरा करू नये अशा सूचना राज्य सरकारतर्फे देण्यात आल्या आहे. नवरात्रोत्सव साजरा करताना नागरीकांनी आरोग्याच्या दृष्टीकोनातून योग्य ती खबरदारी घेणे अत्यावश्यक आहे असे राज्य सरकारेन म्हटले आहे. त्याअनुषंगाने खालीलप्रमाणे सूचना लागू करण्यात आल्या आहेत.
राज्य सरकारने जारी केलेल्या परिपत्रकानुसार नवरात्रोत्सव मंडळांना मंडप उभारण्यासाठी पालिकेकडून पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक असून यासाठी ऑनलाइन सेवा कार्यान्वित करण्यात आली आहे. यंदा विनाशुल्क परवानगी देण्यात येत आहे. पालिकेने निश्चित केलेल्या आकारमानानुसारच मंडप परवानगी दिली जाणार आहे. नवदुर्गेची मूर्ती शाडूची असावी, सजावट पर्यावरणपूरक असावी, सार्वजनिक मंडळातील मूर्ती चार फूट उंचीची, तर घरगुती मूर्ती दोन फूट उंचीची असणेही आवश्यक आहे, असेही या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
याशिवाय, नवरात्रोत्सवाकरीता वर्गणी/देणगी स्वेच्छेने दिल्यास त्यांचा स्विकार करावा. जाहिरातींच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही याची व्यवस्था करावी. तसेच आरोग्य विषयक सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्षिशत करण्यास पसंती देण्यात यावी. तसेच माझे कुटुंब, माझी जबाबदारी या मोहिमेबाबत देखील जनजागृती करण्यात यावी. गरबा, दांडिया किंवा इतर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करु नयेत. त्याऐवजी आरोग्य विषयक उपक्रमे/ शिबीरे आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे असे शासनाच्या नियमावलीत नमूद करण्यात आले आहे.