औरंगाबाद वृत्तसंस्था । राज्यातील विधानसभा निवडणुकीचे मतदान आज पार पडत असून राज्यात अनेक ठिकाणी या मतदानाला गालबोट लागल्याचा घटना समोर येत आहेत. तसेच आता नांदेड जिल्ह्यातील देगलूर, अंतापुर चैनपुर येथील मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीच्या तीन उमेदवारांवर हल्ला झाल्याची माहिती समोर येत आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदेड जिल्ह्यातील देगलुर विधानसभा मतदारसंघात, अंतापुर चैनपुर येथे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रा.रामचंद्र भरांडे यांच्यावर प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न झाला आहे. त्यांच्या गाडीच्या काचा फोडून नासधूस करण्यात आली असून भरांडे यांच्यासह कार्यकर्त्यांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. भरांडे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
देगलूर मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी राखीव आहे. येथे शिवसेनेचे विद्यमान आमदार सुभाष साबणे व काँग्रेसचे माजी आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्यात पुन्हा लढत आहे. पण वंचित बहुजन आघाडीनेही येथे उमेदवार उभे केल्याने निवडणुकीला तिरंगी स्वरुप प्राप्त झाले. वंचितने प्रा.रामचंद्र भरांडे यांना उमेदवारी दिली.