खडसेंचे जावई गिरीश चौधरी यांचा जामीन अर्ज फेटाळला

मुंबई प्रतिनिधी | भोसरी येथील वादग्रस्त भूखंड प्रकरणी ईडीच्या अटकेत असलेले गिरीश दयाराम चौधरी यांचा जामीन अर्ज आज मुंबईच्या विशेष न्यायालयाने फेटाळून लावला आहे.

याबाबत वृत्त असे की, भोसरी येथील वादग्रस्त भूखंड प्रकरणी माजी मंत्री एकनाथराव खडसे हे गोत्यात आलेले आहेत. या प्रकरणी ईडीने आधी त्यांची चौकशी केली होती. यानंतर ५ जुलैपासून त्यांचे जावई गिरीश दयाराम चौधरी हे अटकेत आहेत. तर, त्यांच्या सौभाग्यवतील मंदाताई खडसे यांना समन्स बजावण्यात आले असून त्यांनी चौकशीसाठी वेळ मागून घेतली आहे. गिरीश चौधरी यांचा जामीन अर्ज आधी देखील फेटाळण्यात आला होता. आज पुन्हा त्यांचा अर्ज फेटाळण्यात आलेला आहे.

मुंबई येथील विशेष न्यायालयात गिरीश दयाराम चौधरी यांनी जामीन अर्ज दाखल केला होता. मात्र विशेष न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज नामंजूर केला आहे. यामुळे त्यांच्या समोरील अडचणी वाढल्याचे दिसून येत आहे. ईडीच्या वकिलांनी कोर्टात युक्तीवाद करतांना सांगितले आहे की, गिरीश चौधरी यांचे सासरे हे तत्कालीन वजनदार मंत्री असल्याने त्यांनी सुमारे ५०० कोटी रूपयांचा लाभ होण्यासाठी भोसरी येथील जमीन खरेदी केली होती. हा पदाचा गैरवापर होता. चौधरी यांनी ही खरेदी सहेतूक केल्याचा दावा त्यांनी केला. या अनुषंगाने कोर्टाने चौधरी यांचा दावा फेटाळून लावला. तर गिरीश चौधरी यांचे वकील मोहन टेकावडे यांनी या निकालानंतर आपण याचे अध्ययन करून पुढील निर्णय घेणार असल्याची माहिती दिली.

Protected Content