डॉक्टरांवर हल्ला केल्यास 7 वर्षांपर्यंत तुरुंगवास, जामीनही मिळणार नाही ; केंद्र सरकारचा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) महारोगराईपासून देशाला वाचविण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना दुर्दैवाने लोकांच्या हल्ल्यांचा सामना करावा लागत आहे. पण डॉक्टरांवर होणारे हल्ले आता जराही सहन केले जाणार नाहीत. डॉक्टरांविरोधात हिंसाचार किंवा अशी कोणतीही घटना घडल्यास संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्यात येईल. अगदी डॉक्टरांवरील हल्ला करणाऱ्यांना जामीनही मिळणार नाही, अशी महत्त्वाची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी कॅबिनेटच्या बैठकीत एक अध्यादेश पारित करण्यात आला. याअंतर्गत आता वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर हल्ला करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल. यामध्ये तीन महिने ते 7 वर्षांपर्यंतच्या तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी याबाबतची माहिती दिली. देशात करोनाचा हाहाकार सुरू असताना डॉक्टर, नर्सेसवर होत असलेले हल्ल्यांची दखल घेत केंद्र सरकारने त्यांच्या सुरक्षेसाठी मोठा निर्णय घेत अध्यादेश जारी केला आहे. त्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत साथीच्या आजाराबाबतचा सन १८९१ च्या कायद्यात सुधारणा करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. या अध्यादेशानुसार, वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर हल्ला करणाऱ्यांना जामीन मिळणार नाही आणि 30 दिवसांच्या आत या प्रकरणाचा तपास पूर्ण केला जाईल. एका वर्षाच्या आत यावर निर्णय सुनावण्यात येईल. या प्रकरणी दोषीला 3 महिने ते 5 वर्षांपर्यंतची शिक्षा होऊ शकते. त्याशिवाय, गंभीर प्रकरणांमध्ये 6 महिने ते 7 वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे. इतकंच नाही तर, गंभीर प्रकरणांमध्ये 50 हजार ते 2 लाखापर्यंतचा दंड आकारण्यात येईल.

Protected Content