बदलापूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | बदलापुरातील दोन लहान मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ मंगळवारी बदलापूर रेल्वे स्थानकात तब्बल नऊ ते दहा तास रेल रोको आंदोलन करण्यात आले होते. यामध्ये पोलिसांवर दगडफेक देखील करण्यात आली होती. यातील सहभागी आंदोलकांचा कोणत्या राजकीय पक्षाशी संबंध आहे का हे तपासण्यात येणार आहे. पोलिसांनी केलेल्या व्हिडीओ रेकॉर्डिंगच्या आधारे याचा शोध घेण्यात येईल आणि त्यांचा कोणाकोणाशी संबंध आहे हे सर्व तत्थ्य लवकरच बाहेर येईल, यावेळी या प्रकरणातील आरोपीची पोलीस कोठडी वाढविण्यात आली असल्याचे माहिती ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी बुधवारी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.
बदलापूर रेल्वे स्थानकात केलेल्या रेल रोको मध्ये विद्यार्थी व जेष्ठ नागरिकांचे खूप हाल झाले. रेल्वे आंदोलनामध्ये बदलापूरचे स्थानिक लोक नव्हती. त्यांच्या हातात “मुख्यमंत्री-लाडकी बहीण” योजनेचे बॅनर होते. त्यामुळे या आंदोलनात सहभागी झालेल्या नागरिकांची सखोल चौकशी करण्यात येणार आहे. पोलिसांकडे आंदोलनात सहभागी झालेल्या नागरिकांचे व्हिडिओ आहेत.पोलीस व्हिडिओ पाहून गुन्हे दाखल करीत आहेत. प्रशासनाने संयम काय असतो ते दाखवून दिले. रेल्वे प्रवाशांचे खूप हाल होत होते म्हणून जमाव पांगविण्यात आला. असे स्पष्टीकरण पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. तर पोलिसांवर दगडफेक करणाऱ्या व्यक्तींचा शोध सुरू असून त्यांच्यावर देखील योग्य ती कारवाई करण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले.
बदलापूर येथील आदर्श शाळेत झालेल्या दोन लहान मुलींवर झालेल्या अत्याचाऱ्याच्या विरुद्ध बदलापूर मध्ये मंगळवारी झालेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले आणि रेल्वे स्थानकात रेल रोको करणाऱ्या आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक देखील केली. यासर्व प्रकरणानंतर आज जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आज बदलापूरला भेट देत पोलीस अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली.