मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | बदलापूरच्या शाळेत चिमुकलींवर अत्याचार करणारा आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिसांनी एन्काउंटर केला होता. या एन्काउंटर प्रकरणात 5 पोलिस जबाबदार असल्याचे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे. अक्षय शिंदेंच्या एन्काऊंटर प्रकरणात 5 पोलिस जबाबदार असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून कारवाई करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. आरोपी अक्षय शिंदेच्या आई-वडिलांनी एन्काऊंटर विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर आता न्यायालायाने महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले आहे.

अक्षय शिंदे याला बदलापूरच्या दिशेने नेत असताना त्याने मुंब्रा बायपासनजीक गाडीतच पोलिसांची रिव्हॉल्व्हर हिसकावून घेतली. यामधून त्याने पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला. त्यानंतर पोलिसांन स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात अक्षयचा मृत्यू झाला, असा दावा पोलिसांकडून करण्यात आला होता. मात्र, चौकशी अहवालात अक्षय शिंदे याला बनावट चकमकीत मारण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. या बनावट चकमकीतील पाच पोलीस कर्मचाऱ्यांनी आपल्या बळाचा गैरपद्धतीने वापर केला. त्यामुळे हे पाच पोलीस कर्मचारी अक्षय शिंदे याच्या मृत्यूसाठी जबाबदार आहेत, असे संबंधित अहवालात नमूद करण्यात आले आहे.
अक्षयच्या कुटुंबीयांनी या एन्काऊंटरला बनावट ठरवत न्यायासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली. सरकारने आणि पोलिस प्रशासनाने यावर अद्याप ठोस भूमिका घेतलेली नाही. बदलापूर बलात्कार प्रकरण हा अत्यंत संवेदनशील विषय आहे, ज्यामध्ये न्याय सुनिश्चित करणे महत्त्वाचे आहे. मात्र, आरोपीच्या मृत्यूचा बनावट एन्काऊंटर असल्याचा अहवाल आल्यामुळे पोलिस यंत्रणेच्या विश्वासार्हतेवर मोठे प्रश्न उभे राहतात. आता या प्रकरणात निष्पक्ष आणि स्वतंत्र चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणे अत्यावश्यक आहे, जेणेकरून भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही.