जिथे जाऊ तिथे, ‘खोकेवाला आला’ असे ऐकावे लागते ! : बच्चू कडू

अमरावती-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते तथा माजी मंत्री बच्चू कडू यांनी राज्यातील सत्तांतरानंतर आपल्याला आलेल्या अनुभवाचे कथन करत मनातील व्यथा व्यक्त केली आहे.

अमरावती जिल्ह्यात सध्या बच्चू कडू विरूध्द राणा दाम्पत्य यांच्यात वाद-प्रतिवाद सुरू आहेत. रवी राणा यांनी कडूंनी ‘खोके’ घेतल्याचा आरोप केल्याने या आगीचा भडका उडाला. यानंतर कडू यांनी थेट पोलिसात तक्रार केली असली तरी हे वाद मिटले नाहीत. या प्रकरणात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून देखील दोन्ही बाजूकडून आरोप-प्रत्यारोप सुरूच असल्याचे दिसून येत आहेत. या पार्श्‍वभूमिवर, बच्चू कडू यांनी पत्रकार परिषद घेतली.

या पत्रकार परिषदेत बच्चू कडू म्हणाले की, ”गेली २० वर्षे आम्ही लोकांमधून निवडून येतो तरी देखील इतक्या खालच्या स्तरावर आम्हाला टीका सहन करावी लागते हे मनाला वेदना देणारं आहे. रवी राणा एकट्याच्या जीवावर ही टीका करणार नाही, तेवढी त्याची कुवत नाही. त्यामुळे त्यांचा बोलविता धनी कोण आहे हे तपासणे गरजेचे आहे. त्यांनी फक्त माझ्या एकट्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केले नाही तर ५० आमदार, मुख्यमंत्री शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील प्रश्नचिन्ह निर्माण होणार. आता तर, जिथे जाऊ तिथे खोक्यांवरून ऐकावं लागतं. एवढ्यावेळा खोक्यांचा आरोप झाला आहे की एखाद्याच्या लग्नात गेलो तरी लोकं बोलतात ‘खोकेवाला आला’ !” अशी व्यथा त्यांनी बोलून दाखविली. यामुळे या प्रकरणी आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण देण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे.

आमदार बच्चू कडू पुढे म्हणाले की, अलीकडेच झालेल्या एका बैठकीत बच्चू कडूला ‘थंड’ करायचं असं ठरलं असून तो विडिओ माझ्याकडे येणार आहे. केंद्राची मदत घेऊन बच्चू कडूला अडचणीत आणण्याचं षडयंत्र रचले जात आहे. आता माझ्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. घरातलाच माणूस बोट दाखवत असेल तर मी ते बोट छाटल्याशिवाय राहणार नाही. राणा एक बापाची औलाद असेल तर त्याने १ तारखेपर्यंत पुरावे द्यावे. अन्यथा आम्ही १ तारखेला वेगळा निर्णय घेऊ असा इशारा कडू यांनी दिला आहे. या माध्यमातून त्यांनी राज्य सरकारमधून बाहेर पडण्याचा इशारा दिल्याचे मानले जात आहे.

Protected Content