शेतकऱ्यांसाठी १० हजार कोटींची तरतूद : मुख्यमंत्री फडणवीस

Devendra Fadnavis 1

मुंबई (वृत्तसंस्था) अवकाळी पावसामुळे राज्यात झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी मुंबईत राज्य मंत्रीमंडळाची बैठक आज आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत शेतकऱ्यांना मदतीसंदर्भात आढावा घेण्यात आला. बैठकीनंतर पत्रकार परिषद घेत अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्तांना 10 हजार कोटींच्या तात्काळ मदतीचे निर्देश दिल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

 

राज्यातील शेतकऱ्यांचे अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले असून, हे नुकसान नेमके किती, आणि कसे झाले याची माहिती घेण्याचे काम सुरू असून, लवकरच ही माहिती प्रशासनाच्या हाती येईल. त्यानंतर नुकसानभरपाईसाठी वर्गवारी केल्यानंतर मदतीची रक्कम ठरवली जाईल. यात शेतकऱ्यांना जास्तीतजास्त नुकसानभरपाई देण्याचा प्रयत्न असून वर्गवारी नुसार मदतीची रक्कम निश्चित केली जाईल असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. केंद्र सरकार त्यांच्या नियमांनुसार जी मदत देईल ती देईल, मात्र, त्या मदतीची वाट न पाहता मंत्रिमंडळ उपसमितीने १० हजार कोटी रुपयांची तरतूद करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत, असे फडणवीस म्हणाले. राज्यातील शेतकऱ्यांचे नेमके किती नुकसान झाले याबाबतची अंतिम आकडेवारी उपलब्ध झाली नसल्याने कोणत्या पिकाला किती नुकसान भरपाई द्यावी याबाबत आज निर्णय घेण्यात आला नाही. मात्र येत्या २ ते ३ दिवसात नुकसान भरपाईबाबतचा अंतिम निर्णय घेऊन मदतीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

Protected Content