तळागाळातील जनतेला बाबासाहेबांनी दिला सन्मान : गुलाबराव वाघ

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | धरणगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात शिवसेना सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ आणि माजी नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी आपले विचार मांडले.

या प्रसंगी बोलताना गुलाबराव वाघ यांनी सांगितले की, “तळागाळातील जनतेला स्वाभिमानाने जगण्याचा सन्मान बाबासाहेबांनी मिळवून दिला. त्यांनी देशाच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, कायद्याच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यामुळे त्यांना आधुनिक भारताचे जनक म्हटले जाते.” ते पुढे म्हणाले की, “कोलंबिया विद्यापीठाने बाबासाहेबांना जगातील क्रमांक १ विद्वान ठरवले आहे. ऑक्सफोर्ड विद्यापीठाने देखील त्यांना गेल्या १० हजार वर्षातील प्रभावशाली व्यक्तिमत्त्वांमध्ये चौथे स्थान दिले. बाबासाहेबांचे ६४ विषयांवर प्रभुत्व होते आणि ही बाब इतिहासात अभूतपूर्व आहे.”

कार्यक्रमात युवासेना जिल्हा प्रमुख निलेश चौधरी यांनी सांगितले की, “डॉ. आंबेडकर हे महान बोधिसत्व आहेत. १९५४ मध्ये नेपाळमधील बौद्ध परिषदेतील भिक्खूंनी त्यांना ही सर्वोच्च उपाधी बहाल केली होती. त्यानंतर १९५५ मध्ये दलाई लामांनी त्यांना बोधिसत्व म्हणून संबोधले.” ते म्हणाले, “डॉ. आंबेडकर यांच्या संघर्षामुळे आणि भारतीय संविधान निर्मितीत दिलेल्या योगदानामुळे १९९० साली त्यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात आला. आज ते जगातील कोट्यवधी शोषित, पीडित, वंचित लोकांचे प्रेरणास्थान ठरले आहेत.”

कार्यक्रमास डॉ. आंबेडकर स्मारकाला अभिवादन करण्यासाठी अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यामध्ये शहर प्रमुख भागवत चौधरी, युवासेना उपजिल्हा प्रमुख हेमंत महाजन, शहर प्रमुख परमेश्वर महाजन, नगरसेवक किरण मराठे, बापू महाजन, भरत शिरसाठ, रमेश चव्हाण, विनोद रोकडे, रणजित सिकरवार, किरण अग्निहोत्री, भीमराव धनगर, भूषण शिरसाठ, प्रेमराज चौधरी, रवी अहिरे, गोपाल पाटील यांच्यासह भीमसैनिक आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content