शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जनजागृतीपर नाटिका सादर

जळगाव-लाईव्ह ट्रेडस न्यूज प्रतिनिधी ।  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त जन औषध वैद्यकशास्त्र विभागाच्याच्या वतीने बुधवारी १२ जुलै रोजी सकाळी १० वाजता जनजागृतीपर विशेष नाटिका विद्यार्थ्यांनी सादर केली.

 

यावेळी प्रभारी अधिष्ठाता डॉ. सत्यवान मोरे यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, लोकसंख्या नियंत्रणासाठी शासन स्तरावर अनेक प्रकारच्या उपाययोजना देण्यात आलेल्या आहेत. प्रत्येक नागरिकांनी “हम दो, हमारे दो” यानुसार जबाबदारी घेतली तर लोकसंख्या आटोक्यात येऊन विविध सामाजिक समस्या देखील कमी होतील असे सांगितले.

 

प्रसंगी मंचावर उप अधिष्ठाता डॉ. गजानन सूरेवाड, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड, प्रशासकीय अधिकारी डॉ. जितेंद्र सुरवाडे, जन औषध वैद्यकशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. योगिता बावस्कर उपस्थित होते. प्रसंगी कार्यक्रमाविषयी प्रस्तावनेमध्ये माहिती देऊन लोकांमध्ये प्रभावी जनजागृती करण्याचा उद्देश असल्याचे डॉ. योगिता बावस्कर यांनी सांगितले.

 

तसेच महाविद्यालयातील द्वितीय व तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी विशेष नाटिका सादर करून लोकसंख्या वाढीचे दुष्परिणाम आणि लहान कुटुंबाचे फायदे याबाबत माहिती विशद केली. प्रसंगी काही नागरिकांनी प्रश्नोत्तराच्या स्वरूपात जाणून घेतले.  यावेळी प्रभारी अधिष्ठाता डॉ. मोरे यांनी नाटिका सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक करून उपस्थित लोकांना मार्गदर्शन केले.

 

सूत्रसंचालन व आभार सहाय्यक प्रा. डॉ. सुनयना कुमठेकर यांनी केले. कार्यक्रमासाठी डॉ. गणेश लोखंडे, डॉ. डॅनियल साजी, डॉ. चिराग रामनानी, डॉ. दीपक  वाणी, मरिंगा गमोले,जनसंपर्क सहाय्यक विश्वजीत चौधरी, अजय जाधव, प्रकाश पाटील यांच्यासह कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Protected Content