अहमदाबाद-वृत्तसंस्था | भारतीय धुरंधर फलंदाजांची फळी सपशेल असफल ठरल्यानंतर ऑस्ट्रेलियन बॅटसमननी केलेल्या दमदार फलंदाजीमुळे कांगारूंना तब्बल सहाव्यांदा विश्वचषक पटकांतांना टिम इंडियाचा दारूण पराभव केला.
येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू असलेल्या विश्वचषकाच्या अंतीम सामन्यात भारतीय फलंदाजी अक्षरश: ढेपाळल्यामुळे ऑस्ट्रेलियास अवघ्या २४१ धावांचे आव्हान मिळाले आहे. या खेळपट्टीवर किमान तीनशे तरी धावा बनतील असा तज्ज्ञांचा अंदाज असला तरी भारतीय फलंदाजांनी निराश केले. नाही म्हणायला, रोहित शर्मा, विराट कोहली आणि के. एल. राहूल यांनी चांगली फलंदाजी केली तरी ते मोठी खेळी करण्यात अपयश ठरले. तर अन्य फलंदाजांकडून त्यांना सहकार्य न मिळाल्याने भारताची इनिंग २४० धावांमध्ये आटोपली.
माफक धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियाच्या संघाने जोरदार सुरूवात केली. मात्र शमीने डेव्हीड वॉर्नरला तर बुमराह याने मार्श यांना बाद करून कागारूंना जोरदार धक्का दिला. यानंतर बुमराहनेच स्टीव्ह स्मीथला चार धावांवर बाद करून त्यांना संकटात टाकले. मात्र लाबुशेन व हेड यांनी चिवट फलंदाजी करत भारताचा प्रतिकार मोडून काढला.
हेडने भक्कम बचाव करतांनाच जोरदार फटकेबाजी केली. तर, लाबुशेनने त्याला अतिशय भक्कम अशी साथ दिली. या जोडीसमोर भारतीय फलंदाज अक्षरश: निष्प्रभ झाल्याचे दिसून आले. आणि या दोन्ही फलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या विजयाची पायाभरणी केली. यात हेडने जोरदार शतक फटकावले, तर लाबुशेनने अर्धशतक पूर्ण करत आपल्या संघाचा विजय साकारला. विजय दृष्टीक्षेपात असतांनाच हेड १३७ धावा करून बाद झाला. कागारूंनी भारतीय संघाचा तब्बल सहा गडी राखून पराभव केला.