शेळगाव धरणाच्या पाण्यात बुडून वृद्धाचा मृत्यू !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील शेळगाव येथील धरणात हातपाय धुण्यासाठी गेलेल्या शेळगाव येथील वृध्दाचा पाण्यात पडून बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी २० नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजता उघडकीला आली आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रमेश दामू कोळी (वय-६०) रा. शेळगाव ता.जि.जळगाव असे मयत वृध्दाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, रमेश कोळी हे आपल्या पत्नी व मुलासह जळगाव तालुक्यातील शेळगाव येथे वास्तव्याला आहे. शेतमजूरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात. शनिवारी १८ नोव्हेंबर रोजी पहाटे ५ वाजता रमेश कोळी हे अन्नपुर्णा माता मंदीरात दर्शनासाठी गेले होते. हे मंदीर शेळगाव धरणाजवळ आले. या ठिकाणी हातपाय धुण्यासाठी गेले असता त्यांचा तोल जावून पाण्यात पडल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला. दुसरीकडे त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी त्यांचा शोध घेण्यास सुरूवात केली. परंतू त्यांच्या संदर्भात कोणतीही माहिती मिळाली नाही.

सोमवारी २० नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजता शेळगाव गावातील हेमंत कोळी, भगवान कोळी आणि सुभाष कोळी हे शेळगाव धरणात पोहण्यासाठी गेले. रमेश कोळी यांचा मृतदेह शेळगाव धरणाच्या  पाण्यावर तरंगतांना दिसून आला. त्यांनी तातडीने नशिराबाद पोलीसांनी घटनेची माहिती दिली. पोलीसांनी मृतदेहाचा पंचनामा करून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आला. या घटनेबाबत नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक फौदार हरीष पाटील करीत आहे.

Protected Content