कोलकाता-वृत्तसेवा | आज इडन गार्डनवर रंगलेल्या चित्तथरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाने तीन गड्यांनी दक्षीण आफ्रिकेवर मात करून विश्वचषकाच्या अंतीम फेरीत प्रवेश केला. फायनलमध्ये भारताच्या विरूध्द आता कांगारूंची लढत रंगणार आहे.
काल भारताने न्यूझीलंडचा दणदणीत पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. यानंतर आज कोलकाता येथील ईडन गार्डन मैदानावर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेच्या संघांमध्ये दुसरे सेमी फायनल रंगले. यात दक्षिण अफ्रिकेने पहिल्यांदा फलंदाजी करतांना अपेक्षेनुसार प्रदर्शन केले नाही. आफ्रिकेच्या संघाने फक्त २१३ धावांचे आव्हान दिले. यंात डेव्हिड मिलरने सर्वाधिक १०१ धावा केल्या. क्लासेनने ४७ धावांची खेळी केली. कोएत्झीने १९ धावा केल्या. मार्कराम आणि रबाडाने प्रत्येकी १० धावांचे योगदान दिले. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्सने प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या. जोश हेझलवूड आणि ट्रॅव्हिस हेडने प्रत्येकी दोन गडी बाद केले.
या माफक धावांचे आव्हान घेऊन उतरलेल्या कांगारूंनी जोरदार सुरूवात केली. डेव्हीड वॉर्नरने जोरदार फटकेबाजी केली. यानंतर मात्र आफ्रिकन गोलंदाजांनी अतिशय टिच्चून गोलंदाजी केल्यामुळे सामन्यात रंगत निर्माण झाली. अगदी शेवटच्या टप्प्यापर्यंत हा सामना रंगला. तथापि, ऑस्ट्रेलियाच्या तळाच्या फलंदाजांनी संयमी फलंदाजी केल्यामुळे त्यांनी तीन गड्यांनी विजय संपादन केला.
विश्वचषकाच्या अंतीम सामन्यात आता रविवारी भारत विरूध्द ऑस्ट्रेलिया असा सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. यात कोण बाजी मारणार याकडे आता क्रिकेट रसिकांचे लक्ष लागले आहे.