अनिल पाटील निवडून येणे अशक्य ! : शरद पवारांचे भाकीत

सोलापूर-वृत्तसेवा | एकीकडे पवार काका-पुण्यांमधील संबंधांबाबत संभ्रम निर्माण झाला असतांनाच शरद पवार यांनी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील हे आगामी निवडणुकीत निवडून येणार नसल्याचे भाकित केले आहे.

शरद पवार आणि अजित पवार यांच्यात अलीकडच्या काळात होत असलेल्या गाठीभेटींमुळे राजकीय क्षेत्राचे कुतुहल चाळवले आहे. विशेष करून आपल्या काकांची भेट घेऊन अजित पवार हे सहकार्‍यांसह दिल्लीत अमित शाहा यांना भेटल्याने चर्चेला उधाण आले आहे. ते शरद पवार यांचा काही संदेश घेऊन तर शाहांना भेटले नाही ना ? असा प्रश्‍न विचारण्यात येत आहे. यावरूनच राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा अजितदादा गटाचे मुख्य प्रतोद अनिल भाईदास पाटील यांनी लवकरच गोड बातमी मिळेल असे सूचक वक्तव्य केले होते. हिवाळी अधिवेशनानंतर शरद पवार व अजित पवार एकत्र येतील असा दावा त्यांनी केला होता.

अनिल पाटील यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले. यावर आज शरद पवार यांनी सोलापूर जिल्ह्याच्या दौर्‍यावर असतांना भाष्य केले आहे. ते म्हणाले की, अलीकडेच मी अमळनेरच्या दौर्‍यावर होतो. यात स्थानिक पातळीवर अनिल पाटील यांच्या विरोधात मोठे वातावरण दिसून आले आहे. यामुळे ते पुढील निवडणुकीत निवडून येणार नाहीत असा दावा शरद पवार यांनी केला आहे.

Protected Content