मुंबई । सामनातून भाजपवर टीका करण्यात आल्यानंतर या पक्षाने याला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. आ. अतुल भातखळकर यांनी शिवसेनेची ‘लाचार सेना’ अशी संभावना करून जोरदार हल्लाबोल केला आहे.
सध्या भाजप व शिवसेनेत चांगलीच जुंपल्याचे दिसून येत आहे. आज सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेने भाजपाचा खरपूस समाचार घेतल्यानंतर भाजपानेही त्याला प्रत्युत्तर दिलं आहे. काही दिवसांपूर्वी अंडरवर्ल्ड डॉन दाऊदकडून मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री निवासस्थानी धमकीचे फोन आल्याचा हवाला देत भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे.
अतुल भातखळकर यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, मातोश्री बॉम्बने उडवून द्यायची धमकी मिळाल्यावर कमीत कमी दाऊदच्या फोटोला काळे फासून त्याला चपला मारण्याचा एखादा ब्रम्हांड व्यापी कार्यक्रम लाचार सेनेकडून साजरा व्हायला हवा होता अशा शब्दात त्यांनी शिवसेनेवर जहरी टीका केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जी कामं करायची ती आम्ही दिवसा-ढवळ्या करतो, रात्रीच्या अंधारात नाही हे विधान करुन अप्रत्यक्षपणे भाजपाला टोला लगावला होता. या विधानवरुनही भाजपाने उत्तर देत पोस्टमॉर्टेम दिवसाढवळ्या करण्याचा कायदा असतानाही सुशांत सिंग राजपूतचं शवविच्छेदन मात्र आपल्या राज्यात रात्रीच्या अंधारातच झालं असा टोला आमदार अतुल भातखळकर यांनी शिवसेनेला लगावला आहे.