Home Cities जळगाव महामानवांच्या जयंतीनिमित्त जळगावात गौतम बुद्ध जीवनचित्रांचे आकर्षक प्रदर्शन 

महामानवांच्या जयंतीनिमित्त जळगावात गौतम बुद्ध जीवनचित्रांचे आकर्षक प्रदर्शन 


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त जळगाव येथे ऊर्जा फाउंडेशनतर्फे आयोजित तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जीवनचित्रांवरील अनोख्या प्रदर्शनाचे उद्घाटन उत्साहात पार पडले. या प्रदर्शनाने शहरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेत सांस्कृतिक आणि बौद्धिक वातावरण निर्माण केले.

या प्रदर्शनाचे उद्घाटन मा. महापौर दीपमाला काळे, मुंबई येथील जे. जे. रुग्णालयाच्या डॉ. उत्कर्षा तायडे तसेच साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त ‘काळ्यानीळ्या रेषा’ या पुस्तकाचे लेखक राजू बाविस्कर यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी गौतम बुद्धांच्या जीवनमूल्यांचे महत्त्व अधोरेखित करत समाजात शांतता, समता आणि करुणा या तत्वांची गरज असल्याचे सांगितले.

प्रदर्शनामध्ये प्रख्यात चित्रकार वासुदेव कामत यांनी साकारलेली चित्रे मांडण्यात आली होती. या चित्रांमधून भगवान गौतम बुद्ध यांच्या जीवनातील विविध प्रसंग अत्यंत प्रभावी आणि कलात्मक पद्धतीने सादर करण्यात आले होते. प्रत्येक चित्रातून बुद्धांच्या जीवनप्रवासातील टप्पे, त्यांचे विचार आणि त्याग यांचे दर्शन घडत होते. यामुळे प्रदर्शनाला भेट देणाऱ्या प्रेक्षकांना एक वेगळाच अनुभव मिळाला.

बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित हे प्रदर्शन शहरात विशेष आकर्षण ठरले. अनेक नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट देत चित्रांचा आस्वाद घेतला आणि बुद्धांच्या विचारांशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. सांस्कृतिक उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक विचारांची देवाणघेवाण होत असल्याचे मतही यावेळी व्यक्त करण्यात आले.

या कार्यक्रमाला ऊर्जा फाउंडेशनचे अध्यक्ष उदय सपकाळे, सतीश सुर्वे, मनोज सपकाळे, बाळू नेवे, राम बोरसे, विजय जैन, अशोक कोतवाल, रवींद्र सुरलकर आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच ऊर्जा सपकाळे, मीना तायडे, प्रज्ञा सपकाळे, कैलास तायडे, संदेश तायडे आणि मुदिता सपकाळे यांनी प्रदर्शन यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.


Protected Content

Play sound