जळगाव शहरात शटर वाकवून दुकानांमधून चोरीचा प्रयत्न (व्हिडिओ)

WhatsApp Image 2019 11 21 at 15.24.20

जळगाव, प्रतिनिधी | शहरातील गणेश कॉलनी आणि ख्वाॅजामिया चौकातील युनिटी चेंबर्स मधील नऊ दुकानामध्ये चोरीचा प्रयत्न केल्याचे आज (२१ नोव्हेंबर) सकाळी लक्षात आले. याप्रकरणी अद्याप पोलीसात नोंद करण्यात आलेली नाही.शहरातील गजबजलेल्या भागात चोरीचा प्रयत्न झाल्याने दुकानदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांच्या सुरक्षितेसाठी पोलीस बंदोबस्त वाढविण्यात यावा अशी मागणी येथील व्यापारी करत आहेत.

 

युनिटी चेंबरमधील व्यापारी सकाळी दुकान उघडण्यासाठी आले असता त्यांना शटर वाकविलेल्या स्थितीत दिसून आले. यात एल जी च्या दुकानाचे शटर तीन ते चार फुट वर उचलेले दिसून आले. यानंतर त्यांनी इतर दुकानांची पाहणी केला असता त्यांना इतरही काही दुकानांचे शटर वाकवून चोरी करण्याचा प्रयत्न केल्याचे निदर्शनास आले. रेडचिल्ली बिर्याणी हे दुकान फोडण्याचा प्रयत्न अज्ञात चोरट्यांनी केला. तेथे काही न मिळाल्याने बाजूला असलेल्या ॲड. ज्ञानेश्वर सुर्यवंशी यांच्या दुकानाच्या वरच्या मजल्यावर असलेल्या दुकानाचे शटर उचकावून आत प्रवेश केला. यावेळी त्यांना कागदपत्रे यांच्याशिवाय काहीही मिळाले नाही. यानंतर त्यांनी आपला मोर्चा मनीगुरु इन्व्हेस्टमेंट यांचे दुकानात शिरुन चोरी करण्याचा प्रयत्न केला, तेथेही असफल राहिले. बाजूला असलेल्या कृती कन्स्ट्रक्शन दुकानाचे शटर उचकावून आत शिरुन प्रवेश केला मात्र तेथेही हातात त्यांच्या हातात काहीच लागले नाही.

त्यानंतर चोरट्यांनी शिवराज्य मल्टी सर्व्हिसेस आणि युनिटी चेम्बरमधील मेजर कॉर्नर येथील दिपक राठोड यांच्या दुकानाचे शटर उचकविण्याचा प्रयत्न केला. एल.जी.टी.व्ही. यांचे ऑनलाईनचे कार्यालयातही त्यांना काहीही मिळून आले नाही. त्याच्या बाजूला असलेल्या श्याम कासार यांच्या मयूर फोटो स्टूडीओ, मिलींद केदार यांचे दुकान तर खॉजामिया रोडसमोर असलेल्या सुनिल सदानंद किझुमविल यांचे गणेश बडीस केकशॉप बाजूचे शटर उचकवण्याचा प्रयत्नही झाला. थोडक्यात चोरट्यांनी एकाच रात्रीत या दुकानावरुन त्या दुकानावर जावून दुकाने फोडण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना कोणतीही रक्कम व वस्तू हाती लागली नाही. चोरट्यांच्या हाती काही लागले नाही हे सुदैवाचे असले तरी एवढे सगळे सुरु असताना त्यांना कुणी बघितले नाही किंवा हटकले नाही किंवा पोलिसांच्या गस्ती वाहनाला ते दिसले नाहीत, हे एक आश्चर्यच आहे. त्यांच्याही मनात पोलिसांची भीती दिसून आली नाही, ही बाब अत्यंत गंभीर आहे.

Protected Content