दारूसाठी पैसे न दिल्याने आत्महत्येचा प्रयत्न; शनीपेठ पोलीस ठाण्यात एकाचा प्रताप

जळगाव प्रतिनिधी । शहरातील शनिपेठ पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचार्‍यांना दारु पिण्यासाठी पैशांची मागणी केली. तसेच पैसे न दिल्याने तरुणाने स्वतःच्या हातावर धारदार लोखंडी पट्टी मारुन घेत आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली. याप्रकरणी शनीपेठ पोलीसात तरूणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सागर महारु सपकाळे वय ३१ रा. चौगुले प्लॉट, जळगाव असे जखमी झालेल्या तरूणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार असे की, सागर सपकाळे हा तरुण नेहमी दारु पिण्यासाठी पोलिसांना पैसे मागतो, व त्यास नकार दिला असता, सागर हा स्वतः ला जखमी करुन घेतो. यापूर्वीही त्याने अनेकदा असा प्रकार केला आहे. दरम्यान २ जून रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास सागर सपकाळे हा शनिपेठ पोलीस ठाण्यात आला. याठिकाणी त्याने पोलीस कर्मचार्‍यांना उद्देशून मला पैसे द्या नाहीतर मी माझ्या हातापायाला पट्टी मारुन घेईल व तुमचे नाव कोर्टात व वरिष्ठ अधिकार्‍यांना सांगेन अशी धमकी दिली. त्याला काही कर्मचार्‍यांनी समजविण्याचा प्रयत्न केला असता, त्याने स्वतः हाताने धारदार लोखंडी पट्टी मारुन घेतली. व आत्महत्येचा प्रयत्न केला. हातातून निघालेले रक्त पोलीस ठाण्यातील फरशीवर शिंपडले व मला नियमित  पैसे देत जा, नाही तर मी माझे मानेवर पट्टी मारु पोलीस स्टेशनमध्ये जीव देईल व माझ्या बायका मुलांना सांगेल की पोलिसांना मारले आहे असे कोर्टात सांगायचे, असे बोलून सागरने पुन्हा हातावर पट्टी मारुन घेत स्वतःला जखमी केले. याप्रकरणी सरकारतर्फे शनिपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक योगेश माळी यांच्या फिर्यादीवरुन सागर ससपकाळे विरोधात भादंवि कलम ३०९ प्रमाणे आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ परीस जाधव हे करीत आहेत.

Protected Content