बॅनर फाडल्यावरून धारदार शस्त्राने एकावर हल्ला; संशयिताला अटक

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | झेरॉक्स दुकानाजवळील बॅनर फाडून दुकानदाराशी वाद करीत धारदार शास्त्राने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना पाचोरा शहरात घडली आहे. याबाबत प्राप्त माहिती अशी की, २९ नोव्हेंबर रोजी रात्री २ वाजेचे सुमारास शहरातील भुयारी मार्गालगत असलेल्या झेरॉक्स दुकानाजवळील बॅनर फाडल्याच्या कारणावरून झेरॉक्स दुकानदार भावेश संजय पडोळ याच्याशी पाचोरा येथील हनुमानवाडी चौक, रेल्वे स्टेशन जवळ सुरज राजू पवार (वय – ३०) रा. आशिर्वाद ड्रीम सिटी, पाचोरा व कुणाल मोरे (वय – २९) रा. मिलिंद नगर, पाचोरा यांनी संगणमत करून दुकानदार भावेश यांच्याशी वाद घालुन शिवीगाळ केली व धारदार शस्त्राने पाठीवर, कानाजवळ डोक्यावर, छातीवर उजव्या बाजूला मारहाण करीत गंभीर जखमी केले.

या घटनेप्रकरणी जखमी भावेश संजय पडोळ यांचे वडील संजय पांडुरंग पडोळ यांचे फिर्यादीवरून १ डिसेंबर रोजी पाचोरा पोलिसात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यातील संशयीत आरोपी सुरज राजु पवार यास पोलिसांनी १ डिसेंबर रोजी अटक केली आहे. त्यास पाचोरा न्यायालयाने ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रेड पोलिस उपनिरीक्षक सुनिल पाटील व पोलिस हेड कॉन्स्टेबल राहुल शिंपी हे करीत आहे.

Protected Content