एटीएम कार्ड क्लोनींगच्या प्रयत्नांत असणार्‍यांना अटक; मनीष भंगाळे माफीचा साक्षीदार !

जळगाव प्रतिनिधी । माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी दाऊदच्या पत्नीशी बोलणे केल्याच्या आरोपांमुळे चर्चेत आलेल्या मनीष भंगाळेच्या मदतीने एटीएम कार्ड क्लोन करण्याचा गोरखधंदा सुरू करण्याच्या प्रयत्नात असणारी एक टोळी पोलिसांच्या हाती लागली आहे. धक्कादायक बाब म्हणजे कार्ड क्लोन करून चारशे कोटी रूपयांची चोरी करण्याचा प्लॅन या टोळीने आखला होता. यात मनीष भंगाळे हे माफीचा साक्षीदार बनला असून तो वगळता यातील नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

याबाबत वृत्त असे की, मनीष भंगाळे हे एकनाथराव खडसे यांच्यावरील आरोपांमुळे चर्चेत आला असून नंतर त्याचे दावे खोटे ठरल्याने त्याला अटक देखील करण्यात आली होती. दरम्यान, मनीष भंगाळेच्या संपर्कात जळगावातील काही जण आले होते. या लोकांनी त्याला एटीएम कार्ड क्लोनींग करण्याची मागणी केली. यानुसार त्याने कार्ड क्लोन करून एक हजार रूपये बँक खात्यातून काढले.

दरम्यान, याच प्रकारे एटीएम कार्ड क्लोन करून चारशे कोटी रूपये काढण्याची तयारी या टोळीने केली. मात्र हा सर्व प्रकार कळताच मनीष भंगाळे याने पोलिसांशी संपर्क साधला. यात पोलीस पथकाने भंगाळे याला माफीचा साक्षीदार बनविले. यानंतर रामानंदनगर पोलिसांच्या पथकाने सापळा रचून जळगावातून दोन जणांना अटक केली आहे. या प्रकरणात एकूण नऊ जणांना आरोपी बनविण्यात आले असून यातील उर्वरित सात जणांना अटक करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

दरम्यान, रामानंदनगर पोलीस स्थानकाच्या सूत्रांनी याला दुजोरा दिला आहे. या संदर्भात पोलीस प्रशासन सायंकाळी पाच वाजता पत्रकार परिषद घेऊन आरोपींसह अन्य बाबींचा तपशील जाहीर करणार असल्याची माहिती देखील देण्यात आली आहे.

Protected Content