यावल प्रतिनिधी | यावल येथील क्षयरोगाच्या आजाराला कंटाळून महिलेने तिरुपती नगरातील आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. यासंदर्भात यावल पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
याविषयी अधिक माहिती फिर्यादीनुसार अशी की, ‘यावल येथील तिरुपती नगरात ३२ वर्षीय शेख जावेद शेख जमील हे आई, वडील पत्नी, एक मुलगा आणि मुलगी यांच्यासह राहत प्लंबींगचे काम करुन कुटूंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांची २५ वर्षीय पत्नी शेख शाहिस्ता यांना क्षय रोगाचा आजार झाला होता. मागील चार महिन्यांपासून रावेर तालुक्यातील डॉ सुनिल चौधरी यांचेकडे त्यांचा उपचार सुरु होता.
आज रविवार, दि. २६ डिसेंबर रोजी सकाळी ११ वा. शेख जावेद शेख जमील हे मुलगी शेख मुनिबा सोबत सावदा येथे मामेबहिनीला बाळ झाल्याने तिला बघण्यासाठी सावदा येथे गेले होते तर त्यांचे आई, वडिल आणि मुलगा भुसावळ येथे माझे मावशीकडे गेले होते. त्यावेळी त्यांच्या पत्नी घरी एकटीच होती. शेख जावेद शेख जमील सावदा येथूनन दुपारी ३.३० वाजता मुलीसह यावल येथे आपल्या घरी परतले. त्यावेळी घराचा दरवाजा आतून बंद होता त्यामुळे त्यांनी आपल्या पत्नीस आवाज दिला परंतु काहीही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी घराच्या मागील भिंतीस असलेल्या खिडकीतून डोकावून पाहिले असता पत्नी शेख शाहिस्ता छतास लागलेल्या फॅनला ओढणीने गळ्याभोवती फास लावून लटकलेल्या अवस्थेत नजरेस पडली. लागलीच त्यांनी गल्लीतील लोकांना बोलावून सदर घटनेबाबत सांगितले.
त्यांनी यावल पोलीस स्टेशनला जात आपली पत्नी शेख शाहिस्ता यांनी फास घेतल्याची बातमी दिली. पोलिसांनी घटना स्थळी येत घरातील दरवाजा उघडला. यावेळी आपल्या पत्नीने क्षय रोगाच्या आजाराला कंटाळून गळफास घेतला असे शेख जावेद शेख जमील यांनी पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत सांगितले. लोकांच्या मदतीने शेख शाहिस्ता यांचा मृतदेह खाली उतरवून यावल येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावल ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.तायडे यांनी तपासून शेख शाहिस्ता यांना मयत घोषित केले.’