अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यंदा पावसाळा सरासरीपेक्षा जास्त होत आहे. त्यामुळे जळगाव जिल्हयात दुघर्टना घडत आहे. अशी एक घटना अमळनेर तालुक्यात घडली आहे. तालुक्यातील लोण खुर्द या गावात अतिवृष्टीमुळे कमलबाई शांताराम पाटील यांच्या घराची भिंत कोसळली. त्यामुळे वयस्कर महिला व त्यांच्या कुटुंबीय बेघर झाले. अनेक वर्षापासून ग्रामपंचायतीत जाऊन विनंती करून अखेर कमलबाई थकली पण घरकुल काही मिळाले नाही.
वृध्द महिला ही अशिक्षित असून ६५ वर्षांची आहे. वर्षानुवर्ष प्रतीक्षा करुन देखील ग्रामपंचायतीकडून अद्याप घरकुल प्राप्त नाही. आता ज्या घरात कमलबाई पाटील राहतात त्या घराची भिंत रात्री पडली. त्यानंतर तलाठी पवार यांनी पंचनामा केला आहे. आता पंचनाम्याच्या आणि शासकीय मदतीच्या आशेवर असून महिलेला शासनाने आर्थिक मदत द्यावी अशी मागणी पोलिस पाटील व ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.