Home क्राईम लहान मुलांना शिवीगाळ केल्याचा जाब विचारला, महिलेसह कुटुंबाला मारहाण; वाहनांची तोडफोड

लहान मुलांना शिवीगाळ केल्याचा जाब विचारला, महिलेसह कुटुंबाला मारहाण; वाहनांची तोडफोड


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील अहुजा नगरात गुरुवारी, १५ मे रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास एका धक्कादायक घटनेत एका महिलेसह तिच्या पती आणि मुलाला मारहाण करण्यात आली. घरासमोर खेळणाऱ्या लहान मुलांना शिवीगाळ करणाऱ्या शेजाऱ्याला जाब विचारल्याने हा प्रकार घडला. या मारहाणीत महिलेच्या मालकीची कार आणि दुचाकीचेही नुकसान करण्यात आले. याप्रकरणी रात्री उशिरा जळगाव तालुका पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अहुजा नगरात राहणाऱ्या सुवर्णा गणेश गायकवाड (वय ३४) या त्यांच्या पती आणि मुलासोबत घरी होत्या. गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास त्यांच्या घरासमोर खेळणाऱ्या लहान मुलांना शेजारी राहणारे रवींद्र सुरेश सपकाळे आणि अश्विनी रवींद्र सपकाळे हे शिवीगाळ करत होते. याबद्दल सुवर्णा गायकवाड यांनी त्यांना जाब विचारला. याचा राग आल्याने रवींद्र आणि अश्विनी यांनी सुवर्णा गायकवाड यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

इतकेच नव्हे तर, दोघांनी मिळून सुवर्णा गायकवाड, त्यांचे पती आणि मुलाला लोखंडी आसारीने बेदम मारहाण केली. तसेच, त्यांना जीवे ठार मारण्याची धमकीही दिली. याशिवाय, संतप्त झालेल्या आरोपींनी गायकवाड यांच्या घरासमोर लावलेली त्यांची कार आणि बुलेट गाडी आसारीने मारून तिचे मोठे नुकसान केले. घडलेल्या प्रकारानंतर सुवर्णा गायकवाड यांनी तातडीने जळगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीनुसार, पोलिसांनी रात्री ११ वाजता रवींद्र सुरेश सपकाळे आणि अश्विनी रवींद्र सपकाळे, दोन्ही राहणार अहुजा नगर, जळगाव, यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल गुलाब माळी करत आहेत.


Protected Content

Play sound