जळगाव प्रतिनिधी । जळगावकरांना शिवाजीनगर रेल्वे उड्डाण पुल लवकरात लवकर हवा असतांना खासदार उन्मेष पाटील यांनी याला भेटीचे नाटक करून पुलाची मुदत परस्पर वाढविण्याचा प्रकार गंभीर असून खासदारांना ठेकेदाराचे हित जोपासण्यात इंटरेस्ट असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी यांनी केला आहे.
खासदार उन्मेष पाटील यांनी शिवाजीनगर रेल्वे उड्डाण पुलाच्या कामाची पाहणी करतांना हा पूल चार महिन्यात पूर्ण होणार असल्याची घोषणा केली. जिल्हाधिकार्यांनी ठेकेदाराला ९० दिवसांची नोटीस बजावली असतांना खासदारांनी यात ३० दिवसांची परस्पर वाढ केल्याच्या घोषणेवर राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी यांनी टीका केली आहे.
या संदर्भात लाडवंजारी यांनी म्हटले आहे की, शिवाजी नगर उड्डाणपुल हा सुमारे दीड लाख लोकांचा दररोजच्या वापराचा रस्ता आहे. परंतु, दोन वर्षापासून या पुलाचे काम सुरूच आहे. सहा – सहा महिन्यांची दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे. जिल्हाधिकार्यांनी स्वत: पाहणी करून ९० दिवसांत काम पूर्ण करण्याची नोटीस बजावली होती. त्यामुळे मक्तेदाराकडून तातडीने काम पूर्ण करून घेणे गरजेचे आहे. असे असताना खासदार उन्मेष पाटील यांनी पुलाच्या कामाच्या ठिकाणी पाहणी करून फोटोसेशन करून घेत ठेकेदाराला पाठीशी घातल्याचा आरोप लाडवंजारी यांनी केला आहे.
त्यांनी पुढे म्हटले आहे की, नागरीकांना फेर्याने प्रवास करावा लागतो आहे. सौरभ तिवारी या तरूणाचा नुकताच अपघातात मृत्यू झाला. वेळेत पुलाचे काम पूर्ण झाले असते तर सौरवला गणेश कॉलनीकडून जाण्याची गरज भासली नसती. परंतु पुलाचे काम तातडीने करून घेण्यासाठी ठेकेदाराला सुचना करण्यापेक्षा खासदार उन्मेष पाटील हे ठेकेदाराला एक महिना वाढवून देत चार महिन्यांचा कालावधी देत आहेत. यावरून खासदारांना जनतेच्या हितापेक्षाही ठेकेदाराचे हित जोपासण्याची जास्त काळजी असल्याची टीका देखील अशोक लाडवंजारी यांनी केली आहे.