अमित शाहांची मफलर ८० हजारांची ! : गेहलोतांचा आरोप

जयपूर-वृत्तसंस्था | भारत जोडो यात्रेत राहूल गांधी यांनी घातलेल्या टिशर्टच्या मूल्यावरून ट्रोलींग करणार्‍यांना राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी सुनावत अमित शाह यांच्या मफलरवरून पलटवार केला आहे.

कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी पक्षाच्या ‘भारत जोडो’ यात्रेदरम्यान महागडा टी शर्ट परिधान केल्याची टीका भाजपने केली होती. यावर सोशल मीडियातून मोठ्या प्रमाणात ट्रोलींग देखील करण्यात आले. दरम्यान, यावर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी राजस्थानातील चुरू येथे बोलतांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांच्या महागड्या वस्तूंवरून पलटवार केला आहे. शाह यांची मफलर सुमारे ८० हजार रुपयांची व भाजप नेत्यांचे गॉगल तब्बल अडीच लाख रुपयांचा असल्याचा आरोप त्यांनी केला.

याबाबत अशोक गेहलोत म्हणाले, की ‘भारत जोडो’ यात्रेबद्दल भाजप नेत्यांना काय समस्या आहे? ते कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या टी शर्टविषयी बोलत आहेत, मात्र भाजप नेते स्वत:च अडीच लाख रुपयांचे गॉगल वापरतात. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मफलरची किंमत सुमारे ८० हजार रुपये इतकी आहे. भाजप राहुल गांधी यांच्या टीशर्टचे राजकारण करत आहे, असा आरोपही त्यांनी केला. राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेला गेल्या आठवड्यात कन्याकुमारीपासून सुरुवात झाली. या यात्रेला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने भाजप नेते अस्वस्थ झाले आहेत. त्यातूनच, पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री व भाजपचे इतर नेते आपले काम सोडून राहुल गांधी यांच्यावर टीकास्त्र सोडत असल्याचा आरोप गेहलोत यांनी केला आहे.

Protected Content