पहूर कसबे सरपंचपदी आशाताई जाधव तर उपसरपंचपदी राजू जाधव

पहूर, ता .जामनेर रविंद्र लाठे – जामनेर तालुक्यात राजकीय केंद्रबिंदू असलेल्या पहूर कसबे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भाजपाचेच वर्चस्व सिद्ध झाले असून ग्राम पंचायत सरपंचपदी आशाताई शंकर जाधव यांची तर उपसरपंचपदी राजू रामदास जाधव  यांची  निवड झाली .

आज दुपारी ग्रामपंचायत सभागृहात सरपंच उपसरपंच निवडीचा कार्यक्रम घेण्यात आला .निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडळाधिकारी प्रशांत निंबाळकर यांनी काम पाहिले .

माजी पंचायत समिती सभापती बाबुराव घोंगडे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या ३० वर्षांपासून ग्रामपंचायत मध्ये सत्ता असून या पंचवार्षिक निवडणुकीतही त्यांनी ग्रामपंचायतीवर झेंडा फडकवला आहे. भाजपा प्रणित  जय गोगडी देवळी विकास पॅनलला १७ पैकी ९ जागांवर विजय मिळाला होता .तर शिवसेना – राष्ट्रवादी काँग्रेस -काँग्रेस महाविकास आघाडी पुरस्कृत परिवर्तन पॅनलला ६ जागांवर समाधान मानावे लागले होते .तर राजू जाधव आणि विक्रम घोंगडे हे दोन अपक्ष उमेदवार निवडून आले होते. पहूर कसबे ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी सर्वसाधारण गटाचे आरक्षण जाहीर झाल्याने त्यानुसार आज सरपंच , उपसरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली. 

याप्रसंगी जय गोगडी देवळी विकास पॅनल तर्फे आशाबाई शंकर जाधव यांनी सरपंच पदासाठी अर्ज दाखल केला .तर उपसरपंच पदासाठी अपक्ष उमेदवार राजू रामदास जाधव यांनी अर्ज दाखल केला . आशाबाई  जाधव यांना १० मते मिळाली .भाजपा प्रणीत  राजू जाधव यांना ९ तर आघाडीचे प्रतिस्पर्धी उमेदवार अशोक लक्ष्मण जाधव यांना ८ मते मिळाली .  निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सरपंचपदी आशा जाधव व उपसरपंच पदी राजू जाधव यांची निवड जाहीर केली.  

सरपंच पदासाठी गेल्या काही दिवसांपासून भारतीय जनता पार्टीचे ओबीसी सेल  तालुका अध्यक्ष वासुदेव घोंगडे , माजी सरपंच लक्ष्मण गोरे यांच्या पत्नी सुनिता गोरे , माजी उपसरपंच योगेश भडांगे यांचीही नावे चर्चेत होती .मात्र अखेर विरोधी सदस्यांनीही पाठिंबा दिल्यामुळे आशाबाई शंकर जाधव बिनविरोध निवडून आल्या. तर उपसरपंच पदासाठी  राजू जाधव यांच्या विरोधात आघाडीचे अशोक जाधव यांनी अर्ज दाखल केला असता राजू जाधव यांना ९ मते मिळाल्याने त्यांची उपसरपंच पदी वर्णी लागली.

याप्रसंगी माजी पंचायत समिती सभापती बाबुराव घोंगडे , माजी जि. प. सदस्य राजधर पांढरे , प्रशासक रामचंद्र वानखेडे , लक्ष्मण गोरे ,  अर्जुन लहासे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य अशोक जाधव ,शेरखा तडवी , सोनू  बाविस्कर ,जिजाबाई  लहासे , मनिषा चौधरी , प्रतिभा बनकर , विनोद थोरात ,  ज्योती धनगर , अनिता लहासे , मीराबाई राऊत , विक्रम घोंगडे , वासुदेव घोंगडे , योगेश भडांगे , सुनिता गोरे  यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते

 

Protected Content