केळीचे आगार समजल्या जाणार्या रावेर तालुक्यातील काही शिवारांमधील बागांमध्ये ‘सीएमव्ही’ (हरण्या) या रोगाची लागण झाल्याचे उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. हा रोग प्रचंड गतीने पसरत असल्यामुळे केळी उत्पादकांसमोर मोठे आव्हान उभे राहिले असून यावर व्यापक उपायोजना करण्याची आवश्यकता असल्याबाबत विवेचन करणारा हा लेख.
अस्तित्वावर प्रश्नचिन्ह
केळी हे जगातील सर्वाधीक लोकप्रिय फळ असून वैश्विक अर्थकारण व विशेष करून रोजगारावर याचा मोठा प्रभाव आहे. या पार्श्वभूमिवर, सुमारे पाच वर्षांपूर्वी संयुक्त राष्ट्रसंघाच्या अन्न व कृषी संघटनेने पृथ्वीतलावरून केळी नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याचा अलर्ट जारी केला होता तेव्हा याबाबत कुणी फारसे गंभीर नव्हते. फ्लोरीडा विद्यापीठातील रँडी प्लोएटेज यांनी प्रदीर्घ काळ केलेल्या संशोधनातून केळी पीकासमोर अनेक गंभीर समस्या उभ्या राहिल्या असून यात प्रामुख्याने ‘पनामा डिसीज’ (टीआर४) मुळे केळीच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे अधोरेखीत झाले होते. यावर विजय मिळवण्यासाठी जगभर प्रयत्न सुरू असतांनाच ‘क्लायमेट चेंज’ म्हणजेच हवामानातील बदल हादेखील केळीच्या मुळावर उठल्याचे २०१८ च्या अखेरीस दृश्यमान झाले.
केळीसाठी राष्ट्रीय आणीबाणी
खरं तर गेल्या ६० वर्षांमध्ये हवामानातील बदलाचा केळी पिकावर अनुकुल परिणाम झाल्याचे आधीच सिध्द झाले आहे. बदललेल्या ऋतुचक्रातही केळी टिकून राहिली. तथापि, आता हाच बदल केळीला पृथ्वीवरून हद्दपार करण्याच्या तयारीत असल्याचे भयाण वास्तव समोर आलेले आहे. याचा प्रतिकार करण्यासाठी विविध देशांमध्ये प्रयत्न सुरू झाले आहेत. अनेक देशांनी यासाठी तातडीच्या उपाययोजना करण्यास प्रारंभ केला आहे. यासाठी शेकडो शास्त्रज्ञ कामाला लागले आहेत. यातील सर्वात लक्षणीय बाब कोलंबियात घडली आहे. येथे केळीवर ‘टीआर४’ बुरशीची लागण झाल्याने चक्क राष्ट्रीय आणीबाणी घोषीत करण्यात आली. होय…केळीवरील रोगासाठी आणीबाणी ! तेथे पोलीस आणि लष्करी जवानांनी अतिशय काळजीपूर्वक या रोगाची लागण झालेल्या सुमारे १८० हेक्टरवरील केळीच्या खोडांना नष्ट केले. अजूनही तेथील केळी उत्पादक दहशतीखाली आहेत. हीच अस्वस्थता अन्य लॅटीन (दक्षीण) अमेरिकन देशांमध्ये आहे. आता हीच भिती आशियाई देशांमधील केळी उत्पादकांना वाटू लागली आहे.
दुहेरी फटका
अर्थात, असाध्य विकार आणि हवामानातील बदलाचा धोका या कात्रीत वैश्विक पातळीवरील अर्थात ग्लोबल केळी उत्पादक सापडले आहेत. तर अगदी याच प्रकारचा फटका स्थानिक म्हणजेच लोकल उत्पादकांना पडतांना दिसत आहे. अलीकडच्या काळात विषम हवामानाचा फटका जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादकांना सातत्याने पडतांना दिसत आहे. कडाक्याच्या उन्हामुळे बागा करपून जात असल्याचे अनेक वर्षांपासून केळी उत्पादक अनुभवत आहेत. एकीकडे हा मार सुरू असतांना या वर्षी नवीन धोका उदभवला आहे. रावेर तालुक्यातील काही भागांमध्ये सीएमव्ही या विषाणूची लागण झाल्याचे दिसून आले आहे. स्थानिक शेतकरी याला हरण्या या नावाने ओळखतात. या रोगावरदेखील अद्यापही कोणतीही उपायोजना नसून याचा प्रसारदेखील विलक्षण गतीने होत असल्याने शेतकरी हबकले आहेत. एकदा का या रोगाने केळीला ग्रासले की, याला नष्ट करण्यावाचून कोणताही पर्याय शेतकर्यांसमोर नसतो. रावेर तालुक्यातील कुंभारखेडा, वाघोदा आदी गावांमध्ये याचा प्रादूर्भाव आढळून आला असून याच्या लागण होण्याची गती पाहता इतर भागांमध्येही याचा प्रादूर्भाव होण्याची भिती आहे. यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक दिवसांपर्यंत तापमान कमी असल्याने हा रोग झपाट्याने पसरल्याचे स्पष्ट झाले आहे. म्हणजे एकीकडे ४० अंशावर तापमान गेल्याने केळीच्या बागांना धोका असतांना दुसरीकडे तापमान कमी झाल्याने हरण्याचा प्रादूर्भाव झाल्याने आता शेतकर्यांनी करावे तरी काय ? हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
…अन्यथा केळी होणार हद्दपार
कोलंबियासारखा देश केळीसाठी राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करू शकतो. तर, केळीवर अर्थकारण अवलंबून असणार्या जळगाव जिल्ह्यात याबाबत फारशा हालचाली नसाव्यात ही बाब गंभीर आहे. काही वर्षांपूर्वी ‘ब्लॅक सिगाटोका’ अर्थात करपा रोगाने जिल्ह्यातील केळी उत्पादकांना मोठा फटका बसला होता. तेव्हा हरीभाऊ जावळे यांनी पुढाकार घेऊन शेतकर्यांना मदतीचे मोठे पॅकेज मिळवून दिले होते. याच्या जोडीला शेतकर्यांनी अतिशय सजगपणे ‘ब्लॅक सिगाटोका’चा प्रतिकार केला होता. यामुळे आता या रोगाचे यशस्वी निर्दालन करण्यात आले असले तरी ‘सीएमव्ही’ सारख्या रोगांचा प्रादूर्भाव होऊ लागला आहे. यामुळे आतादेखील अशा मदतीसह केळीवरील रोगांसाठी वेळीच उपाययोजना न केल्यास जिल्ह्यातून हे पीक हद्दपार होईल हे सांगण्यासाठी कुणा ज्योतिष्याची आवश्यकता नाही. यामुळे केळीसाठी आपत्कालीन उपायोजना करण्याची वेळ आलेली आहे. यावर वेळीच उपाय न झाल्यास येणारी पिढी आपल्याला माफ करणार नाही.
केळी महात्म्य
जळगाव जिल्ह्यातील अर्थकारणाचा आधारस्तंभ म्हणून केळीची ओळख आहे. ज्येष्ठ पत्रकार सुरेशजी उज्जैनवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार या पीकाकडे पाहण्याचा आपला दृष्टीकोण नक्की बदलू शकते.
* एकूण क्षेत्रफळ : जिल्ह्यातील सुमारे ४५ हजार हेक्टर क्षेत्रावर केळीची लागवड होते.
* उत्पादन : जिल्ह्यात दरवर्षी सरासरी साडे तीन हजार कोटी रूपयांचे उत्पन्न केळीद्वारे मिळते. यावरील उलाढालीचा आयाम लक्षात घेता हाच आकडा पाच हजार कोटींवर जातो.
* रोजगार : केळी पिकाने जिल्ह्यातील सुमारे १.२४ लाख लोकांना आपल्या स्वत:च्याच गावात रोजगार प्रदान केला आहे.
* वाहतूक : केळीच्या मुख्य हंगामात दररोज सुमारे साडेचारशे ट्रकमधून केळीची वाहतूक केली जाते. तर रेल्वेलाही यातून मोठे उत्पन्न मिळते.
* जळगाव जिल्ह्यातील केळीचे उत्पन्न हे जगातील सातव्या क्रमांकाचे आहे. म्हणजे आपल्या जिल्ह्यास देश समजले तर आपण जगातील सातव्या क्रमांकाचे केळी उत्पादक ठरू !