चंदूलाल पटेल हाजीर हो….आता महाजनांचा दुसरा शिलेदार अटकेच्या मार्गावर !

जळगाव प्रतिनिधी | आ. गिरीश महाजन यांचे जामनेरातील संपूर्ण व्यवहार सांभाळणारे जितेंद्र पाटील यांना बीएचआर घोटाळ्यात अटक झाल्यानंतर आता याच प्रकरणात त्यांचे खासमखास आमदार चंदूलाल पटेल यांच्यावर पकड वॉरंट जारी करण्यात आले आहे. यामुळे ईडीच्या कारवाईला आर्थिक गुन्हे शाखेच्या कारवाईने उत्तर देण्याचा खेळ आता सुरू झाल्याचे दिसून येत आहे.

बीएचआर घोटाळ्यात जामनेर येथील जितेंद्र पाटील यांना आधीच अटक करण्यात आलेली आहे. आमदार महाजन यांचे जामनेरातील ते क्रमांक एकचे समर्थक आणि चाणक्य म्हणून ओळखले जात होते. तेथील बहुतांश राजकीय खेळ्या जितेंद्र पाटील यांच्या निवासस्थानावरूनच आखल्या जात होत्या. यामुळे जितेंद्र पाटील यांच्यावर हात टाकून आमदार गिरीश महाजन यांना राज्य सरकारने पहिला धक्का दिला होता.

आता याच म्हणजे बीएचआर प्रकरणात आमदार चंदूलाल पटेल यांच्यावरही पकड वॉरंट जारी करण्यात आले आहे. गेल्या महिन्यात जितेंद्र पाटील यांच्यासह इतरांना अटक झाली तेव्हाच पटेल यांच्यावरही फिल्डींग लावण्यात आली होती. मात्र याचा सुगावा लागल्याने त्यांनी आधीच पोबारा केला होता. तेव्हापासून त्यांचा शोध सुरू आहे. काल ईडीने भोसरी येथील भुखंडाच्या गैरव्यवहारात माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना अटक केल्याने आता बीएचआर प्रकरणात चंदूलाल पटेल यांच्या अटकेची शक्यता बळावली आहे.

चंदूलाल पटेल हे मोठे बांधकाम व्यावसायिक आहेत. ते आधीपासूनच गिरीश महाजन यांच्याशी सलगी राखून होते. मात्र महाजन हे जलसंपदा मंत्री बनल्यानंतर ही मैत्री अधिक घट्ट झाली. अर्थात ही दोस्ती महाजन आणि पटेल या दोघांना फलदायी ठरली. पटेल यांनी मोठमोठे व्यवहार सुरू केले. राजकीय वरदहस्त लाभल्याने त्यांच्या प्रगतीचा वेग वाढला. तर गिरीश महाजन यांना देखील आर्थिकदृष्ट्या सक्षम असणारा एक भक्कम साथीदार मिळाला. हा दोस्ताना इतका पक्का झाला की, महाजन यांनी चक्क चंदूलाल पटेल यांना विधानपरिषदेवर निवडून आणले. राजकारणाचा ओ-की-ठो कळत नसतांनाही आमदार बनल्यानंतर पटेल हे महाजन यांच्या सोबत सावलीसारखे वावरत असल्याचे सर्वांनी पाहिले होते. या दरम्यान त्यांनी अनेक मोठे आर्थिक व्यवहार देखील केले. यात शीवतीर्थ मैदानासमोर जी. एम. फाऊंडेशनमध्ये प्रति भाजप कार्यालय सुरू करण्याची कल्पना देखील त्यांचीच. याचमुळे जी.एम. फाऊंडेशनमध्ये भाजपमधील एक प्रति सत्ताकेंद्र उभे राहिले. या सर्व बाबींचा भारतीय जनता पक्षावर अतिशय विपरीत परिणाम झाला. महाजन यांच्या भोवतीच्या भांडवलदार कोंडाळ्याचे नेतृत्व पटेल यांनी केले. त्यांनी पक्षाच्या अनेक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा पाणउतारा केला. त्यांची खिल्ली उडविण्याचे, छळण्याचे काम केले. यामुळे अनेक जण दुखावले गेले. यातून बरेच जण आ. गिरीश महाजन आणि भारतीय जनता पक्षापासून दूर गेले. जोवर महाजन मंत्री होते तोवर याकडे कुणी लक्ष दिले नाही. मात्र सत्ता गेल्यानंतर याची भयावहता लक्षात आली. असे असले तरी चंदूलाल पटेल हे महाजन यांचे कट्टर समर्थक म्हणून कार्यरत असतांना आता ते बीएचआर घोटाळ्यात फरार झाले आहेत.

ईडीने आपल्यावर केलेली कारवाई ही आकसातून केल्याचे आज सकाळी एकनाथराव खडसे यांनी राष्ट्रीय मीडियासमोर सांगितले आहे. काल त्यांचे जावई अडकले असून येत्या काही दिवसांमध्ये नाथाभाऊंसह त्यांच्या पत्नीवर देखील कारवाई होऊ शकते. आता हे सारे सुरू असतांना भाजपच्या खेळीला प्रत्युत्तर देण्यासाठी आमदार गिरीश महाजन यांना अडचणीत आणण्याचे प्रयत्न राज्य सरकार करणार हे निश्‍चीत आहे. यासाठी बीएचआर प्रकरणात महाजन यांचे समर्थक आमदार चंदू पटेल यांच्या भोवती अटकेचा फास आवळण्याची कारवाई सुरू झाली आहे. तर याच प्रकरणात महाजनांच्या निकटवर्तीयांनी काही मालमत्ता खरेदी केल्या असल्याची चर्चा असून याबाबतही कारवाई होण्याची शक्यता आहे. अर्थात खडसे विरूध्द महाजन म्हणजेच ईडी विरूध्द आर्थिक गुन्हे शाखा होय. हा सामना येत्या काही दिवसांमध्ये चांगलाच रंगणार आहे.

Protected Content