पालकमंत्र्यांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी (व्हिडीओ)

WhatsApp Image 2019 11 02 at 8.16.43 PM

जळगाव, प्रतिनिधी । जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पीकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पीकांच्या नुकसानीमुळे संपूर्ण जिल्ह्यात गंभीर पीक परिस्थिती निर्माण झाली आहे. पीकांच्या नुकसानीमुळे जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. अशाप्रसंगी जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीचे सरसकटपणे पंचनामे एक आठवड्याच्या आत करून ते शासनाला तात्काळ सादर करावेत. असे निर्देश पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आज दिले.

राज्याचे वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पीक नुकसानीबाबत तातडीची आढावा बैठक घेतली, यावेळी ते बोलत होते. या बैठकीस आमदार चंदुलाल पटेल, आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील गायकवाड, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी रविंद्र भारदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी बी. ए. बोटे, नाबार्डचे श्रीकांत झांबरे, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अरुण प्रकाश, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष नंदकुमार महाजन यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी, उप विभागीय कृषि अधिकारी, विमा कंपनीचे अधिकारी आदि उपस्थित होते.

बैठकीपूर्वी पालकमंत्री ना. महाजन यांनी ममुराबाद, विदगाव, डांबुर्णी आदि गावातील शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन अतिवृष्टीमुळे झालेल्या मका, सोयबीन, कापूस, ज्वारी आदि शेतपीकांच्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच तेथील शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या समजून घेतल्या, तसेच तुम्ही धीर सोडू नका. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचा धीर दिला. तसेच पिकांच्या नुकसानीचे पंचनामे प्रशासन एक आठवड्याच्या आत पूर्ण करणार आहे. पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पीकाचे मोठया प्रमाणात नुकसान झाल्याचे चित्र सर्वत्र स्पष्टपणे दिसून येत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत देण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला जाईल असेही ना. महाजन यांनी भेटीप्रसंगी सांगितले.

पालकमंत्री पुढे म्हणाले की, जिल्हा प्रशासनाने अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे सरसकट पंचनामे तात्काळ पूर्ण करावेत. यासाठी पुढील एक आठवडा कोणीही सुट्टी घेवू नये. पंचनामे वेळेत पूर्ण होण्यासाठी यंत्रणेने अधिक वेळ काम करुन वेळेत पंचनामे पूर्ण करावेत. एकही शेतकरी पिकाच्या नुकसानीच्या पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता प्रशासनाने घेण्याचे निर्देशही पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.

नुकसान भरपाईचा फॉर्म भरण्यासाठी पीक विम्याच्या पावतीची आवश्यकता नाही
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पीक विमा कंपनीकडून भरपाई मिळण्यासाठी करावयाच्या अर्जासोबत पीक विमा काढलेल्या पावतीची पीक विमा कंपनीकडून मागणी करण्यात येत आहे. अशी बाब अधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली असता पालकमंत्र्यांनी विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना याबाबत जाब विचारुन अशा पावतीची आवश्यकता कशासाठी आहे. शेतकऱ्यांनी पीक विमा घेतल्याची नोंद आपल्याकडे असताना पुन्हा पावतीची मागणी करु नये असे सांगितले. तेव्हा पावतीची आवश्यकता नसल्याचे विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी बैठकीत सांगितले. त्यामुळे आता शेतकऱ्यांना अर्जासोबत पावती जोडण्याची आवश्यकता नसल्याचे पालकमंत्र्यांनी बैठकीत सांगितले. तसेच शेतकरी अडचणीत असतांना बँकांनी सद्य परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांकडून कर्जाच्या वसुलीसाठी तगादा लावू नये. अशा सुचना बँकेच्या अधिकाऱ्यांना दिल्यात. त्याचबरोबर वीजबीलाची वसुली थांबविण्यासाठी शासन स्तरावर विचार सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले.

अतिवृष्टिमुळे संपूर्ण राज्यात भीषण परिस्थिती असल्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी दहा हजार कोटी रुपयांची तरतुद करण्याची सुचना प्रशासनास दिली आहे. तसेच केंद्र शासनाकडेही मदतीची मागणी केली आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी शासन नेहमीच सकारात्मक असल्याचेही ना. महाजन यांनी या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलतांना सांगितले.

Protected Content