तुमचे दहशतवादी, आमचे दहशतवादी असा फरक करणे चुकीचे – भारत

 

संयुक्त राष्ट्रे : वृत्तसंस्था । आमचे दहशतवादी व तुमचे दहशतवादी असा फरक जगात कुठेही केला जात असेल तर तो चुकीचा असून दहशतवाद हा दहशतवाद असतो, त्याचा कठोरपणेच मुकाबला केला पाहिजे असे भारताने म्हटले आहे.

 

 

११ सप्टेंबर २०११ मध्ये अमेरिकेत झालेल्या हल्लय़ाच्या वीस वर्षांनंतर पुन्हा एकदा दहशतवादाच्या संकल्पनांचे वेगवेगळ्या मार्गाने अर्थ लावण्याचे प्रयत्न केले जात असून हिंसक राष्ट्रवाद, उजव्या गटातील दहशतवाद असा कुठलाच भेदभाव मान्य करता येणार नाही.

 

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत जागतिक दहशतवाद विरोधी धोरण या विषयावरील सातव्या ठरावावेळी भारताचे संयुक्त राष्ट्रातील दूत टी.एस तिरुमूर्ती यांनी सांगितले, की आंतरराष्ट्रीय समुदायाने दहशतवाद हा सगळ्या मानवजातीला धोका असल्याचे सांगून त्याचा पराभव करणे हाच एक उपाय असल्याचे मान्य केले आहे. या दहशतवादाचा मुकाबला करीत असताना कुठले अपवाद करता येणार नाहीत. ११ सप्टेंबरच्या हल्लय़ानंतर जगात दूरगामी परिणाम झाले. त्यात दहशतवादाविरोधात सगळे जग उभे ठाकले.

 

२०११ मध्ये हल्ला होण्यापूर्वी तुमचे दहशतवादी व आमचे दहशतवादी असा फरक केला जात होता. पण आता दहशतवाद हा जगालाच धोका आहे, त्यात तुमचे आमचे असे काही नसते हे जगाला कळून चुकले आहे. दोन दशकांनी आता आपण हीच विभागणी पुन्हा होताना पाहतो आहे. काही लोकांकडून वेगळ्या संकल्पना वापरून वांशिक व इतर हिंसक दहशतवाद किंवा बंडखोरी, राष्ट्रवादातून उफाळणारा हिंसाचार, उजव्या गटांचा हिंसाचार असे प्रकार केले जाऊ लागले आहेत. सदस्य देशांनी इतिहास विसरता कामा नये. दहशतवाद मग तो कुठल्याही गटाचा असला तरी दहशतवादच असतो, त्याचे कुठले प्रकार करण्याचे प्रयत्न करणे चुकीचे आहे. दहशतवादाच्या जागतिक धोक्याचा कठोरपणे मुकाबला केला पाहिजे. सध्याची धोरणे ही आंतरराष्ट्रीय दहशतवाद रोखण्यात कमी पडत आहेत.

 

Protected Content