यावल, प्रतिनिधी | गेल्या काही दिवसांपासून यावल शहरात व शहरालगत असलेल्या शेती पिकांचे मोकाट गुरढोरांकडुन मोठे नुकसान करीत आहेत. या संदर्भात मोकाट गुरढोरांचे बंदोबस्त लावण्यात यावल नगर परिषद हे कुचकामी ठरत असल्याने अखेर शेतकऱ्यांनी पोलीस प्रशासनाकडे धाव घेऊन त्यांना न्याय मिळावा असे निवेदन सादर केले आहे.
यावल शहरातील शेतकऱ्यांनी मोकाट गुरांढोरांकडून होणाऱ्या नुकसान संदर्भात आज दिनांक ९ जानेवारी रोजी पोलीस निरिक्षक अरूण धनवडे यांना निवेदन दिले. या निवेदनात यावल शहराच्या आजुबाजुच्या शेती शिवारात अनेक शेतकऱ्यांची शेतजमीन असुन , मागील वर्षी झालेल्या अतीवृष्टीमुळे आधीच शेतकरी बांधवांची हाताशी आलेली पिके ही वाया गेली असतांना , या सर्व संकटावर मात करन् शेतकऱ्यांनी अतिशय संकटाच्या अवस्थेत पुनश्च दुसऱ्या हंगामाकरिता गहु , हरभरा, दादर अशा पिकांची शेतात पेरणी केली आहे. असे असतांना शहरातील काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी त्यांच्याकडे असलेली गुरे आणि घोडे ही जनावरे हेतुपुरस्पर मोकाट सोडुन दिले असल्याने ही जनावरे शेता घुसुन शेती पिकांचे मोठे नुकसान करीत आहे. या मोकाट जनावरांपासुन पिकांचे संरक्षण व्हावे यासाठी शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी कडाक्याच्या थंडीत शेतात जावुन या मोकाट गुरांना आणि घोडे हाकलण्यासाठी जागता पहेरा द्यावा लागत आहे. शेतकऱ्यांनी बऱ्याच वेळी या गुरेढोरांचे व घोडयांच्या मालकांशी भेट घेवुन आपल्या गुरेढोरांना आवर घालण्याची त्यांना विनंती केली. मात्र, त्या गुरेढोरे व घोडयांच्या मालकांनी उलट शेतकऱ्यांनी दमदाटी करून उद्धटपणाची वागणुक दिली. तरी पोलीस प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करून या मोकाट गुरेढोरांचा आणि घोडयांचा बंदोबस्त लावुन न्याय मिळुन द्यावे अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनावर शेतकरी नितेश सुरेश गडे , आत्माराम दुर्गादास फेगडे, मोहन राजपुत, लखन पवार, शरद निबांळकर, विलास कमलाकर फेगडे, अशोक डिगंबर महाजन, हेमराज जगन्नाथ फेगडे, देवराम कृष्णा राणे, दिवाकर मुरलीधर तळेले, मधुकर विश्वनाथ महाजन, रामदास कौतीक चौधरी, ओंकार देवराम राणे , यशवंत अर्जुन फेगडे, पुरुषोत्तम रामदास चोपडे आदी शेतकऱ्यांच्या या निवेदनावर स्वाक्षरी आहे. यावल पोलीस निरिक्षक अरूण धनवडे यांनी शेतकऱ्यांच्या समस्या व अडचणी जाणुन घेत यावल येथील पिक सरंक्षण सोसायटीच्या ठेकेदारांशी चर्चा करून त्यांना काही सुचना दिल्या असुन आपण या संदर्भात प्रसंगी नगर परिषद प्रशासनाची देखील मदत घेवु असे आश्वासन शेतकऱ्यांना दिले.