मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नगरपंचायत हद्दीतील विविध प्रभागातील नागरिकांच्या प्रत्येक घरातून तसेच ठीक ठिकाणी असलेल्या मंदिरातून पूजेचे निर्माल्य जमा करण्यासाठी नगरपंचायतीने नुकतीच खरेदी केलेल्या घंटा गाडी पैकी एक स्वतंत्र घंटा गाडीची व्यवस्था करावी अशी मागणी माजी नगरसेवक संतोष मराठे यांनी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी गजानन तायडे यांचेकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.
संतोष मराठे यांनी दिलेल्या पत्रात म्हटलेले आहे कि, आदिशक्ती संत मुक्ताई साहेबांच्या पवित्र करकमलांनी पावन झालेली तिर्थक्षेत्र भूमी म्हणजेच श्रीक्षेत्र मुक्ताईनगर येथे हिंदू धर्म संस्कृती जोपासणारी भाविक माता भगिनी, वारकरी संप्रदायाची मंडळी मोठ्या प्रमाणावर आहे. त्यातच श्री. स्वामी समर्थ सेवा मार्गाचे परमपूज्य श्री अण्णासाहेब मोरे दादा .. श्री. नानासाहेबजी धर्माधिकारी प्रतिष्ठान, राष्ट्रीय प्रवचनकार प्रदीपजी मिश्रा व इतर सर्वच सेवा मार्गातील अनुयायी वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे या मंडळींकडून धर्म संकृती जोपासली जावून दैनंदिन सेवेत वेळोवेळी पूजा विधी मोठ्या प्रमाणावर केला जातो. आणि नुकताच श्रावण मास लागल्यामुळे घरोघरी तसेच प्रत्येक मंदिरात बेल पत्री व पूजा साहित्य वापरले जाते त्यामुळे निर्माल्य मोठ्या प्रमाणावर जमा होत असते. तसेच येणारा गणपती उत्सव असेल किंवा नवरात्री उत्सव यातूनही निर्माल्य मोठ्या प्रमाणावर निघत असते. त्यामुळे हे निर्माल्य नदी पात्रात टाकले जाते.
दरम्यान शासन स्तरावर माझी वसुंधरा अंतर्गत व स्वच्छ भारत मिशन अंतर्गत नगरपंचायत तर्फे नागरिकांकडन प्रत्येक घरातून कचरा संकलन केले जाते याच धर्तीवर नुकतीच दोन घंटा गाडी वाहने नगरपंचायत मुक्ताईनगर तर्फे खरेदी करण्यात आलेली असून यातील एक वाहन हे केवळ मुक्ताईनगर नगरपंचायत हद्दीतील विविध प्रभागातील नागरिकांच्या प्रत्येक घरातून तसेच ठीक ठिकाणी असलेल्या मंदिरातून पूजेचे निर्माल्य जमा करण्यासाठी एका स्वतंत्र घंटा गाडीची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे.