आता उत्सुकता जेडीसीसीच्या अध्यक्षपदाची : ‘हे’ आहेत दावेदार !

मुक्ताईनगर, पंकज कपले | जिल्हा बँक निवडणुकीत जबरदस्त यश मिळवल्याने एकनाथराव खडसे आणि त्यांच्या समर्थकांचा उत्साह तर दुणावला आहेच, पण जेडीसीसीच्या अध्यक्षपदाच्या निवडीत त्यांचा शब्द अंतीम मानला जाणार असल्याचेही स्पष्ट झाले आहे. सर्वाधीक जागा मिळाल्याने अध्यक्ष राष्ट्रवादीचाच होणार असल्यामुळे आता या पदावर कुणाची वर्णी लागते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. सद्यस्थितीनुसार चार नावांचा यासाठी विचार होऊ शकतो. जाणून घ्या कोण आहेत दावेदार ?

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा आज निकाल लागला असून भुसावळच्या जागेचा अपवाद वगळता उर्वरित सर्वच्या सर्व म्हणजे २० जागा महाविकास आघाडीच्या सहकार पॅनलने जिंकल्याची बाब राज्य स्तरावर कुतुहलाचा विषय ठरली आहे. महाविकास आघाडीच्या पॅनलचे शिल्पकार हे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील होत यात कुणाचे दुमत असू शकत नाही. तर विजयासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा नाथाभाऊंनीच केल्याचे आजच्या निकालातून दिसून आले आहे. अगदी अशक्य वाटणार्‍या जागादेखील खेचून आणल्याने खडसे यांची ताकद पुन्हा एकदा दिसून आली आहे. यामुळे जिल्हा बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीत देखील त्यांच्या शब्दाला मान राहील हे स्पष्ट झाले आहे. सद्यस्थितीत अध्यक्षपदासाठी चार सक्षम दावेदार असून यातील दोघे मुक्ताईनगर मतदारसंघातील असल्याची बाब लक्षणीय आहे.

१) गुलाबराव देवकर : माजी मंत्री गुलाबराव देवकर हे दीर्घ काळापासून जिल्हा बँकेत संचालक म्हणून निवडून येत आहेत. इच्छा नसतांनाही पक्षाने म्हटले म्हणून त्यांनी लोकसभा निवडणूक लढविली. यामुळे आता जिल्हा बँकेची जबाबदारी टाकून त्यांचे पक्षातर्फे पुनर्वसन केले जाईल अशी शक्यता आहे. यामुळे त्यांना मोठे पाठबळ मिळण्याची शक्यता देखील आहे. तथापि, त्यांच्या उमेदवारीच्या विरोधात सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या याचिकेवर नेमका काय निकाल लागणार ही बाब देखील त्यांच्या वाटचालीसाठी महत्वाची ठरणार आहे.

२) रोहिणी खडसे-खेवलकर : जिल्हा बँकेच्या विद्यमान अध्यक्षा रोहिणीताई खडसे-खेवलकर यांच्याकडे जिल्हा बँकेची धुरा पुन्हा येण्याची शक्यता सुध्दा नाकारता येत नाही. गेल्या सहा वर्षात त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा बँक प्रगतीपथावर गेली आहे. संचालक मंडळात मातब्बर मंडळी असतांनाही दबावात न येता त्यांनी बँकेचा गाडा चांगल्या प्रकारे हाकला असल्यामुळे त्या देखील अध्यक्षपदासाठी हॉट फेव्हरीट आहेत.

३) रवींद्रभैय्या पाटील : जिल्हा बँक अध्यक्षपदासाठी अजून एक दावेदार असणारे नाव म्हणजे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील आहेत. त्यांना देखील आजवर अशा प्रकारचे मोठे पद मिळालेले नाही. यामुळे पक्ष नेतृत्वाने विचार केल्यास त्यांना अध्यक्षपदाची जबाबदारी मिळू शकते. तर मतदारसंघातील बेरजेचे राजकारण लक्षात घेऊन नाथाभाऊ सुध्दा त्यांचे नाव लाऊन धरू शकतात.

४) डॉ. सतीश पाटील : माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांचे देखील राजकीय पुनर्वसन बाकी असल्याने त्यांना या पदावर काम करण्याची संधी मिळू शकते. विशेष करून आधी रावेर लोकसभा मतदारसंघातील अध्यक्ष असल्याने आता जर जळगावला प्राधान्य मिळाले तर देवकर वा डॉ. पाटील यांच्यापैकी एकाची वर्णी लागू शकते.

गेल्या वेळेस लेवा पाटीदार समाजाचा अध्यक्ष असल्याने आता मराठा समाजातील अध्यक्ष बनावा असा निर्णय देखील वरिष्ठ पातळीवरून होण्याची शक्यता आहे. असे झाल्यास वर नमूद केलेल्या नावांपैकी तिघांमध्ये स्पर्धा होण्याची देखील शक्यता आहे. अर्थात, या सर्व निवड प्रक्रियेत माजी मंत्री नाथाभाऊंचा शब्द कुणाच्या पारड्यात जातो हे महत्वाचे आहे. कारण जिल्हा बँकेत राष्ट्रवादीला सर्वाधीक जागा मिळाल्याने अध्यक्ष याच पक्षाचा होणार ही बाब उघड आहे. या पार्श्‍वभूमिवर, आता अध्यक्षपदाची संधी कुणाला मिळणार याची उत्सुकता लागली आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!