नाथाभाऊ तुम्ही निष्ठावंत की बंडखोर ?

eknath khadse

नाथाभाऊ, तुम्हाला राजकारण शिकवावे, एवढा मी मोठा नाही. पण गेल्या सुमारे ३० वर्षांपासून जळगाव जिल्ह्याच्या पत्रकारितेच्या क्षेत्रात मी कार्यरत आहे, आणि जन्मल्यापासून आजपर्यंत जळगाव जिल्ह्याचा एक नागरिक आहे. या नात्याने किंवा हवं तर तुमचा एक अप्रत्यक्ष कार्यकर्ता या नात्याने म्हणा, पण मला हा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून प्रकर्षाने सतावतोय. त्याचे समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने माझी अस्वस्थता वाढली आहे. गेल्या काही महिन्यांपासून तुम्ही लांडगा आला रे आला…, या गोष्टीप्रमाणे, मी चाललो.., चाललो.., म्हणून भाजपातच थांबले असल्याने नेमके तुमच्या मनात काय चालले आहे ? तेच समजत नाही, असे झाले आहे.

बरे ठाम निर्णय तुम्ही घेवू शकणार नाही, याची शक्यता नाही. कारण तुम्ही आता काही नवखे तरुण राजकारणी नाही. मग सतत जातो, जातो म्हुणुन कुठेही न जाण्याचे किंवा कुठेही न जाता, नुसत्या गाठी-भेटी घेवून ‘जातो-जातो’ असे इशारे देण्याचे कारण काय ? एकूणच या सगळ्या पार्श्वभूमीवर तुमची, पक्षाची आणि कार्यकर्त्यांची अवस्था केविलवाणी होत आहे. एकतर तुम्ही पक्षावर निष्ठा ठेवून, तो देईल ती कामगिरी निमुटपणे पार पाडावी, किंवा बाहेर पडून दुसरीकडे नशीब आजमवावे. पण हा धर-सोडचा खेळ आता पुरे करावा, असे वाटते.

भाजपा हा शिस्तीचा पक्ष समजला जातो. त्यात बेडूकउड्या मारणारे नेते फार कमी आहेत. अगदी आडवाणी-जोशी यांच्या सारख्या नेत्यांनीही अजिबात खळखळ न करता निवृत्ती स्वीकारली आहे. अशी अनेक उदाहरणे देता येतील. अगदी आता राज्यात तुमच्यासोबत तिकीट नाकारण्यात आलेले विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे हे ज्येष्ठ नेतेही शांतपणे पक्षाच्या आदेशाप्रमाणे काम करत आहेत. नाही म्हणायला पंकजा मुंडे यांनी थोडा धक्का देण्याचा प्रयत्न केला, पण तिथेही तुम्ही उपस्थित असल्यानेच त्याची जास्त दखल सगळ्यांना घ्यावी लागली होती. पण त्यानंतरही पुन्हा सगळीकडे अचानक शांतता पसरली आहे.

लेखक- विवेक उपासनी

या सगळ्या चक्करमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेची मात्र उगाचच उठ-बस होते आहे. ते ही केविलवाणे होवून एकमेकांकडे बघत आहे. तुम्ही बॅग भरली की, लगेच तीन गाड्या तुमच्या गेटपाशी लागतात, तुम्ही कुठल्या गाडीत बसणार म्हणून तिघेजण आशाळभूतपणे एकमेकांकडे बघतात. (आता महाआघाडी केल्याने ते एकमेकांशी हुज्जतही करू शकत नाहीत ना.., बिच्चारे !) तुम्ही बॅग घेवून बंगल्याच्या गेटजवळ येतात, थोडावेळ इकडे-तिकडे बघतात, तिन्ही गाड्या आल्याची खात्री करून घेता आणि पुन्हा काहीतरी आठवल्यासारखे करून आत निघून जातात. हे आपले वाटच बघत बसतात. आतापर्यंत त्यांनी तीन वेळा फटाक्यांचे बॉक्स आणि गुलालाचे पोते घरून कार्यालयात आणले आणि कंटाळून पुन्हा घरी नेवून ठेवले आहेत. (हा झाला गमतीचा भाग…)

नाथाभाऊ, खरंतर जेव्हा तुमचे मंत्रिपद गेले तेव्हाच वाटले होते की, तुम्ही आता वेगळा मार्ग स्वीकारणार. कारण आधीच तुम्ही मुख्यमंत्रीपद न मिळाल्याने नाराज होतात. त्यात आहे ते पद गेल्यावर तुम्ही एक मिनिटही पक्षात राहणार नाही, असे सगळ्यांनाच वाटत होते. पण तेव्हा तुम्ही आश्चर्यकारकरित्या संयम दाखवत पक्ष सोडला नाही. तसे बघितले तर पाच वर्षांचे कॅबिनेट मंत्रिपद आणि पाच वर्षे विरोधीपक्ष नेतेपद हा अनुभव बघता मुख्यमंत्रीपदावर पहिला हक्क तुमचाच होता. एक जळगावकर म्हणून माझीही ती मनापासून इच्छा होती. पण तेव्हा नेमके काय घडले ? ज्यामुळे तुम्हाला ते पद मिळाले नाही, ते तुम्ही आणि पक्षश्रेष्ठींनाच माहीत, कारण तोपर्यंत तरी फडणवीस आणि महाजन ही नावे तुम्हाला विरोध करण्याएवढी मोठी नव्हती. पण तेव्हाही तुम्ही संयम ठेवला.

आताही एकापाठोपाठ एक तुम्ही कधी बंडखोरीचा तर कधी संयमाचा पवित्रा घेत असल्याने बाकीच्या पक्षांची उठ-बस तर होतेच पण तुमच्या समर्थकांचीही घालमेल होतेय. तुम्हाला विधानसभेचे तिकीट मिळाले नाही तुम्ही नाराज, पण तेव्हढ्यात मुलीला उमेदवारी मिळाली, तुम्ही शांत. रोहिणीताई निवडणुकीत पराभूत झाल्या, तुम्ही पुन्हा दोन-तीनदा जाण्याचे इशारे दिले, गोपीनाथ गडावरून तुम्ही खाली उतरलात, तेव्हा तर सगळ्यांना वाटले की, आता तुम्ही नक्की जाणार, पुन्हा ‘त्या’ तीन गाड्या आशाळभूतपणे गडाच्या पायथ्याशी आल्या. पण तेव्हाही तुम्ही दिल्लीचे बोलावणे आले म्हणून तिकडे गेलात, तिकडून आल्यावर पुन्हा सगळे शांत. वाटले पक्षश्रेष्ठींकडून काहीतरी ठोस आश्वासन मिळाले असावे. तेवढ्यात तुम्ही पुन्हा नाव घेवून फडणवीस आणि महाजनवर तोफ डागली. वाटले आता खेळ खल्लास पक्षश्रेष्ठींनी तुमची मागणी डावलली असावी. तेवढ्यात जि.प. निवडणूक आली, ती तुम्ही खांद्यावर घेतली. पुन्हा ‘तिघांच्या’ आशा पल्लवित झाल्या, आता नाराज नाथाभाऊंचा गट आपल्याला आतून मदत करणार म्हणून पुन्हा गुलाल आणि फटाक्यांची तयारी सुरु झाली. पण काय पुन्हा जि.प. त भाजपचीच सत्ता आली. पुन्हा तुम्ही निष्ठावंत वाटू लागलात.

ज्या फडणवीस आणि महाजन यांच्यावर चारच दिवसांपूर्वी तुम्ही नाव घेवून तोफ डागली होती, त्यांच्यासोबत तुम्ही अल्पोपहार घेतला. जि.प. विजयानंतर तुम्ही आणि गिरीशभाऊ एकमेकांना पेढा भरवताना दिसलात आणि आम्हाला १० वर्षांपूर्वीचे दिवस आठवले. आता पुढे काय ? हे प्रश्नचिन्ह सध्या प्रत्येकाच्या मनात कायम आहे, (त्या तीन गाड्याही कधीच्या खोळंबल्या आहेत, त्यांना थांबवायचे की, आपापल्या घरी जावू द्यायचे?) त्याचे उत्तर लवकरात लवकर देणे केवळ आणि केवळ तुमच्याच हातात आहे. ते लवकर मिळावे, एवढीच अपेक्षा…! धन्यवाद..!!

==============================

Protected Content