चोपडा (प्रतिनिधी) शिरपूर शहरातील ओसवाल जैन समाजाचे तत्कालीन संघपती ताराचंद डागा यांच्या निधनानंतर समाजाचे अध्यक्ष पद साधारणपणे सात ते साडेसात वर्षांपासून रिक्त होते.परंतू नुकतीच जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुवालाल ललवाणी यांची सर्वानुमते अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
नुतन जैन स्थानकात समाजाची महत्वपूर्ण बैठक नुकतीच पार पडली. सदर बैठकीत २०२० चा चातुर्मास विषयावर चर्चा रंगण्या पुर्वीच समाजात अनेक वर्षापासून अध्यक्ष नसल्याची खंत सचिन बागरेचा या तरुणाने मनोगत व्यक्त करीत असतांना बोलून दाखवली. तसेच श्रीसंघात अध्यक्ष म्हणून सुवालालजी ललवाणी यांचे नाव सुचविले. यावेळी उपस्थित समाजबांधवांच्या एकमताने ललवाणी यांना संघपती पदासाठी नियुक्ती करण्याचा ठराव पास झाला. याप्रसंगी साधुमार्गी संप्रदायाचे अध्यक्ष विजय बाफना म्हणाले की, अध्यक्ष पदाची निवड किती वर्षाकरिता केली जाते आहे? यावर अध्यक्षपद हे १५ महिन्या करिता ठेवावे व ज्या संप्रदायाचा चातुर्मास असेल. त्यावेळी त्या चातुर्मासात त्या संप्रदायाचा अध्यक्ष राहील, असे मत बाफना यांनी मांडले. याबाबत उपस्थित समाजबांधवांनी सहमत दर्शविली. त्यानुसार अध्यक्ष पदावर सुवालालजी ललवाणी यांची १५ महिन्याकरिता नियुक्ती झाली. सोशल मिडीयाच्या माध्यमातून समाजबांधवांनी ललवाणी यांना शुभेच्छा दिल्या. शिरपूर येथील समाजबांधवांनी त्यांचा शाल , श्रीफळ , पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.